सलमान खानने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यातीलच एक म्हणजे कुस्ती, आखाडा आणि संघर्ष यावर आधारीत ‘सुलतान’ हा चित्रपट. अशातच आता चित्रपटाला प्रदर्शित होऊन १० वर्षे झाल्यानंतर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सांगितलं की या चित्रपटासाठी सलमान खानलाच पहिली पसंती होती आणि या चित्रपटासाठी त्यांना तोच हवा होता, पण यावेळी त्यांनी चित्रपटासाठी हॉलीवूड अभिनेत्याचा विचार केल्याचाही खुलासा केला आहे.
‘सुलतान’ची कल्पना कशी सुचली, याबद्दल अली अब्बास जफर यांनी स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, या चित्रपटाची कथा स्वतःच्या कमतरतांवर मात करणाऱ्या एका कुस्तीपटूच्या भावनिक प्रवासाभोवती उभी करण्यात आली.
ते म्हणाले, “सर्व अडचणींवर मात करत स्वतःच्या अहंकाराशी लढणाऱ्या एका माणसाच्या एका ओळीच्या कथेतून सुलतानची कल्पना सुचली. मला नेहमीच क्रीडावर आधारित चित्रपट आवडतात. मला मातीशी जोडलेला, अगदी अस्सल देसी चित्रपट बनवायचा होता. त्यामुळे आम्ही कुस्ती हा खेळ निवडला. भारतात कुस्तीला मोठा इतिहास आहे. माती, जमिनीशी नातं, पडणं, पुन्हा उभं राहणं आणि प्रतिस्पर्ध्याशी झुंज देणं हे सगळं आयुष्याशी खूप मिळतंजुळतं आहे.”
सलमानचं केलं कौतुक
अली अब्बास जफर यांनी सलमान खानच्या मेहनतीचंही भरभरून कौतुक केलं. या शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक भूमिकेसाठी सलमानने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं, अशी आठवण त्यांनी सांगितली. ते म्हणाले, “सुलतानसाठी सलमान खानने अभिनेता म्हणून सर्वस्व पणाला लावलं. शरीरयष्टीत केलेला बदल, हरियाणवी भाषेवर प्रभुत्व मिळवणं, कुस्तीचं कठोर प्रशिक्षण घेणं, तसंच भूमिकेच्या गरजेनुसार वजन वाढवणं आणि कमी करणं या सगळ्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे मला कोणतीही चिंता नव्हती. कारण मी त्याला कथा ऐकवली त्याचदिवशी तो म्हणाला होता, या कथेसाठी ज्या प्रकारचं शारीरिक रूपांतर आवश्यक आहे, ते मी नक्की करेन.”
या हॉलीवूड अभिनेत्याला केलेली विचारणा
मुलाखतीत अली अब्बास जफर यांनी आणखी एक मोठा खुलासा केला. ‘सुलतान’मध्ये प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी सुरुवातीला रणदीप हुड्डा नव्हे, तर हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलोन यांचा विचार करण्यात आला होता. ते म्हणाले, “रणदीप हुडाने साकारलेल्या भूमिकेसाठी अनेक नावांवर चर्चा झाली होती. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे सिल्वेस्टर स्टॅलोन. रॉकीसारखा चित्रपट केलेल्या स्टॅलोनपेक्षा सुलतानला प्रशिक्षण देण्यासाठी योग्य व्यक्ती दुसरी कोण असू शकते, असा आमचा विचार होता. मी त्यांची भेटही घेतली होती. त्यांना पटकथा खूप आवडली होती, पण त्यांच्या तारखा जुळल्या नाहीत.”
स्टॅलोन या चित्रपटाचा भाग होऊ न शकल्यानंतर रणदीप हुडाचाच त्या भूमिकेसाठी योग्य निवड ठरल्याचं अली यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, “त्या भूमिकेसाठी मला एक उत्तम अभिनेता हवा होता. रणदीपने यापूर्वी ‘किक’मध्ये सलमानबरोबर काम केलं होतं, त्यामुळे दोघांमध्ये चांगला समन्वय होता. त्याने सुलतानमध्ये केलेलं काम अप्रतिम होतं.”
