‘अलायन्स’च्या सेटवर सलमान खान दिसल्यापासून त्याला या शोमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. या उत्सुकतेला लक्षात घेत निर्मात्यांनी गेल्या काही भागांमध्ये सलमान आणि सोहेल खान यांच्या भेटीची काही झलक दाखवली होती. अखेर आजच्या भागाच्या शेवटी सलमान खानची ‘अलायन्स’मध्ये एंट्री झाली. शोमध्ये प्रवेश करताच तो सर्वांना म्हणाला, “काळजी करू नका, मी इथे होस्ट बनायला आलेलो नाही.” आगामी भागाच्या प्रोमोमध्ये सलमान खान सोहेल खान आणि सीमा सजदेह यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे करताना दिसणार आहे. याशिवाय, शोमध्ये तो तुरुंगवासाच्या अनुभवावरही भाष्य करताना दिसणार असल्याची झलक प्रोमोमध्ये दाखवण्यात आली आहे.
सलमान खान नुकताच त्याचा धाकटा भाऊ सोहेल खानला भेटण्यासाठी ‘अलायन्स’ या शोमध्ये सहभागी झाला. शोमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने इतर स्पर्धकांशीही संवाद साधला. यावेळी इतर स्पर्धकांची वयावरून खिल्ली उडवल्याबद्दल त्याने बालीला सुनावलं. तसेच मिनी माथूर यांच्याकडे पाहत तो मिश्कीलपणे म्हणाला, “आता मला समजलं, कबीर तुला एवढा का घाबरतो.”
सलमान खानने सांगितला तुरुंगातील अनुभव
आगामी भागाच्या प्रोमोमध्ये सलमान खानने तुरुंगातील दिवसांची आठवण देखील सांगितली. तो म्हणाला, “काही वर्षांपूर्वी जेव्हा मी तुरुंगात गेलो होतो, तेव्हा आमच्या समोर लोखंडी गज होते. जागा खूपच लहान होती. एका बाथरूमचा वापर ५० ते ७० कैदी करत होते. तिथे भारतीय पद्धतीचं शौचालय होतं. कधी-कधी त्यात सरडेही असायचे. ते कायम भरलेलं असायचं.”
काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला आतापर्यंत चार वेळा तुरुंगात जावं लागलं आहे. १९९८ मध्ये तो तीन दिवस न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर २००६ मध्ये सहा दिवस, २००७ मध्ये पुन्हा सहा दिवस आणि २०१८ मध्ये दोन दिवस त्याला तुरुंगात राहावं लागलं होतं. ‘अलायन्स’च्या आगामी भागात सलमान खानच्या उपस्थितीतील आणखी अनेक गोष्टी समोर येणार आहेत.
प्राइम व्हिडीओवरील ‘अलायन्स’चा ग्रँड फिनाले ७ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. अली गोनी हा शोचा पहिला फायनलिस्ट ठरला असून, वृत्तांनुसार मिनी माथूर आणि नीती टेलर हे टॉप ३ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवू शकतात.
