Salman Khan talks about on Dharmendra Health : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असताना ३ दिवसांपूर्वी सलमान खान त्यांच्या भेटीला गेला होता. सध्या धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. देओल कुटुंबीय वेळोवेळी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देत आहेत. अशातच सलमानने धर्मेंद्र यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे.
गुरुवारी सलमानने त्याच्या दा-बंग द टूर रीलोडेडच्या आधी कतारमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याच्या फिटनेस जर्नीतील प्रेरणेबद्दल त्याला विचारण्यात आलं. त्याने लगेचच धर्मेंद्र यांचं नाव घेतलं आणि त्यांचं कौतुक केलं.
व्हिडीओमध्ये, एक इन्फ्लुएन्सर सलमानला त्याच्या फिटनेस प्रेरणेबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. यावर सलमान खान म्हणाला, “मी इंडस्ट्रीत येण्याआधी २-३ जण होते आणि त्यार सर्वात महत्त्वाचे धर्मेंद्र होते. ते माझ्या वडिलांसारखे आहेत. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मला आशा आहे की तो बरे होतील”.
धर्मेंद्र व सलमान खान यांचं नातं खूप खास आहे. धर्मेंद्र नेहमीच सलमानला प्रेमाने मुलगा म्हणतात. एकदा तर धर्मेंद्र यांनी त्यांच्या बायोपिकसाठी सलमान योग्य अभिनेता असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, धर्मेंद्र श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास १२ दिवसानंतर त्यांना बुधवारी, १२ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते रुग्णालयात असताना त्यांच्या निधनाच्या अफवाही पसरल्या, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला खूप मनस्ताप सहन करावा लागला. धर्मेंद्र यांच्यावर आता घरीच उपचार सुरू आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर वेळोवेळी त्यांच्या तपासणीसाठी घरी येत आहेत.
धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते शेवटचे करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहाणी चित्रपटात दिसले होते. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटात त्यांनी शबाना आझमीबरोबर किसिंग सीनही दिला होता. पुढे ते श्रीराम राघवनच्या ‘इक्कीस’ चित्रपटात झळकणार आहेत. डिसेंबरमध्ये रिलीज होणार असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे.
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘सिकंदर’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर त्याने आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’मध्ये कॅमिओ केला होता. सध्या तो बिग बॉस 19 होस्ट करतोय. ‘बॅटल ऑफ गलवान’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे. यामध्ये चित्रांगदा सिंह महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
