Salman Khan New Movie: बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खानच्या नवीन चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मातृभूमी या सिनेमाची चर्चा होत आहे. आधी या सिनेमाचे नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ असे होते, त्यानंतर चित्रपटाच्या नावात बदल केला गेला आणि ‘मातृभूमी’ हे नवीन नाव ठेवलं गेलं.

आता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे त्याने नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. आता हा सिनेमा कोणता, त्याच्याबरोबर या सिनेमात आणखी कोणते कलाकार दिसणार, तसेच हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार, या सगळ्याबद्दल जाणून घेऊ…

सलमान खानने नुकतीच त्याच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या नवीन चित्रपटात कोणाबरोबर काम करणार आहे याबद्दल लिहिले आहे. हा एक ॲक्शन चित्रपट असणार आहे. वामसी पैदीपल्ली (Vamshi Paidipally) हा चित्रपट दिग्दर्शित करणार असून दिल राजू चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

त्याने दिग्दर्शनक वामसी पैदीपल्ली यांच्याबरोबर फोटो शेअर करत लिहिले, “एप्रिलपासून वामसी पैदीपल्ली आणि दिल राजू यांच्याबरोबर.”

श्री व्यंकेटश्वरा प्रोडक्शनने एक्स अकाउंटवर चित्रपटाबद्दल अधिक माहिती शेअर केली आहे. या प्रोजेक्टबद्दल लिहिताना सलमान खानचेदेखील त्यांनी कौतुक केले. त्यांनी लिहिले, “सलमान खान अशी व्यक्ती आहे, ज्यांनी असे क्षण जगभरातील प्रेक्षकांना दिले, जे प्रेक्षक साजरे करू शकले. आता ते आमचे प्रिय ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक वामशी पेदिपल्ली यांच्याबरोबर हातमिळवणी करणार आहेत. या एप्रिलमध्ये चित्रपटाचे काम सुरू होणार आहे.”

वामसी पैदीपल्ली यांच्या कामाबद्दल बोलायचे तर त्यांनी ‘मुन्ना’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पहिले पाऊल ठेवले. या सिनेमात लोकप्रिय अभिनेता प्रभास प्रमुख भूमिकेत दिसला होता, त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे गाजले, त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली.

ज्युनिअर एनटीआरची प्रमुख भूमिका असलेला ‘बृंदावनम’, राम चरणची भूमिका असलेला ‘येवडू’ असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. ‘महर्षि’ सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच, तमिळ सुपरस्टार विजयची प्रमुख भूमिका असलेला ‘वरिसु’ या सिनेमाचेदेखील त्यांनी दिग्दर्शन केले आहे.

आता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाची निर्मिती दिल राजू श्री व्यंकेटश्वरा प्रोडक्शन हाऊस करणार आहे. दिल राजू यांनी आजपर्यंत ६० सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, दोन चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

निर्माते आणि दिग्दर्शक या नवीन सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सलमान खानबरोबर काम करणार आहेत. वामसी पैदीपल्ली आणि दिल राजू यांनी पाच चित्रपटांत एकत्र काम केले आहे. हे सिनेमे प्रचंड गाजले होते.

आता सलमान खानच्या नवीन चित्रपटाचे नाव काय असणार, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.