Salman Khan Aishwarya Rai : सलमान खान व ऐश्वर्या राय यांचं नातं प्रचंड वादग्रस्त राहिलं होतं. दोघांच्याही ब्रेकअपबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. पण दोघांचं एकेकाळी एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. सलमान तर ऐश्वर्याच्या चित्रपटाच्या सेटवर तिच्याबरोबर वेळ घालवायला जायचा. सलमान व ऐश्वर्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी याबद्दल सांगितलं होतं.
सलमान ऐश्वर्याला एकत्र वेळ घालवताना हिमानी शिवपुरींनी स्वतः पाहिलं होतं. सलमान ऐश्वर्याला चित्रपटाच्या सेटवर रात्री उशिरा भेटायला यायचा. दोघांचा वाद झाला होता, त्याची आठवणही त्यांनी सांगितली होती. हिमानी शिवपुरी यांनी पहिल्यांदा ऐश्वर्याबरोबर ‘आ अब लौट चलें’ मध्ये काम केलं होतं, त्यानंतर ‘हमारा दिल आपके पास है’ आणि ‘उमराव जान’ मध्ये स्क्रीन शेअर केली होती.
रोज रात्री ऐश्वर्याला भेटायला यायचा सलमान खान
‘हमारा दिल आपके पास है’ च्या शूटिंगच्या दिवसांच्या आठवणी त्यांनी रेड एफएम पॉडकास्टशी बोलताना सांगितल्या. “आम्ही हैदराबादमध्ये शूटिंग करायचो. तेव्हा सलमान खानही खूप जास्त काम करत होता. तो दररोज रात्री ऐश्वर्याला भेटायला यायचा आणि सकाळी निघून जायचा,” असं हिमानी म्हणाल्या.
ऐश्वर्या रायचा स्वभाव कसा होता, याबद्दल हिमानी शिवपुरींनी सांगितलं होतं. “ती खूप छान होती. ती खूप वाचायची आणि आम्ही खूप गप्पा मारायचो. ती फक्त सुंदरच नाही, तर व्यक्ती म्हणूनही ती खूप चांगली आहे असं मला वाटतं,” असं हिमानी यांनी म्हटलं होतं.

सलमान आणि ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपबद्दल विचारलं असता त्यांनी फार बोलणं टाळलं. “त्यांचं नातं यशस्वी झालं नाही. त्यांच्यात काय समस्या होत्या हे त्यांनाच जास्त चांगलं ठाऊक असेल,” असं त्या म्हणाल्या.
हिमानी यांनी सलमान व ऐश्वर्याच्या भांडणाबद्दल सांगितलं होतं. “मला आठवतंय की एकदा आम्ही फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होतो. ऐश्वर्या अभिषेकबरोबर रोहन सिप्पीच्या चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि सलमान आला होता. तो मला म्हणाला होता, ‘हिला समजावून सांगा. तिला वाटतं की ती खूप सुंदर आहे. तिला वहीदा रहमान यांच्याकडे पाहायला सांगा.’ मी त्याला शांत राहायला सांगायचे,” असं हिमानी शिवपुरी म्हणाल्या.
