बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांचा मोठा चाहतावर्ग सर्वदूर पसरलेला आहे. अशाच कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजेच सलमान खान होय. बॉलीवूडचा भाईजान म्हणून लोकप्रिय असलेला हा अभिनेता सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता एका कार्यक्रमातील त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने तो चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला सलमान खानचा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात सलमान खानने हजेरी लावली होती. ज्यावेळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आली त्यावेळी सलमान खानने तिची गळाभेट घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अभिनेत्रीला भेटण्यासाठी सलमान खान सोफ्यावरून उठत होता, त्यावेळी त्याला पटकन उठता आले नाही. सोफ्यावरून उठताना त्याला त्रास झाल्याचे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आता व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काय म्हणाले नेटकरी?
सलमान खानच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने, “भाईजान, आता म्हातारा होत आहे”, असे म्हटले. दुसऱ्या नेटकऱ्याने, “आपल्या बालपणीचे आवडते कलाकार आता म्हातारे होत चालले आहेत. काहीच शाश्वत नसते याची आठवण करून देणारा क्षण आहे”, असे लिहिले. एका चाहत्याने म्हटले, “तुमचा आवडता अभिनेता म्हातारा होताना पाहणे दु:खद आहे.” अनेक नेटकऱ्यांनी, “सोफा फारच मऊ असल्याने सलमानला उठता येत नसेल”, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त करीत मजा घेतली आहे.
सलमान खानने १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली होती. त्याआधी १९८९ साली प्रदर्शित झालेल्या बीवी हो तो ऐसी या चित्रपटात सहायक भूमिका साकारली होती. महत्त्वाचे म्हणजे २३ ऑगस्टला सलमान खानचा ‘मैंने प्यार किया’ हा लोकप्रिय चित्रपट सिनेमागृहांत पुन्हा एकदा रिलीज झाला आहे.
हेही वाचा: “माझ्या चांगल्या गोष्टी दाखवल्या नाहीत…”, इरिना ‘बिग बॉस’वर नाराज; घराबाहेर येताच पहिली प्रतिक्रिया
सलमान खान लवकरच ‘सिकंदर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच, सलमान खान बिग बॉसच्या १८ व्या सीझनचे होस्टिंग करताना दिसणार आहे.