Malaika Arora on son Arhaan Khan: अभिनेत्री मलायका अरोरा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. मलायका तिच्या फिटनेसमुळे अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावरील तिचे अनेक फोटो, व्हिडीओ लक्ष वेधून घेतात.
आता मात्र अभिनेत्री तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नाबद्दल तिच्या मुलाचे मत काय आहे, याबद्दल अभिनेत्रीने वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे हे जाणून घेऊ…
“सुखाने संसार करण्याच्या…”
मलायका अरोराने नुकतीच टाइम्स इंटरनेटला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “मला वाटतं की नाती सतत बदलत असतात. मी निराशावादी नाही. माझा या सगळ्यावर विश्वास आहे, पण मला असंही वाटतं की याची काहीच शाश्वती नाही; म्हणजे आपण कायम एकत्र राहण्याच्या, सुखाने संसार करण्याच्या कल्पनेबरोबर मोठे झालो आहोत. याचे कारण आपण त्याच प्रकारचे चित्रपट पाहिले आहेत आणि तशीच पुस्तकं वाचली आहेत. पण, मला वाटतं की तेवढच पुरेसं नाही.”
पुढे ती म्हणाली, “गोष्टी कायमस्वरूपी असतात, असे मला वाटत नाही. गोष्टी सतत बदलत असतात. आपण हळूहळू गोष्टींशी जुळवून घेतो, परिस्थितीशी जुळवून घेतो.”
याच मुलाखतीत तिने तिच्या मुलाबद्दल अरहान खानबद्दल वक्तव्य केले. तो गोष्टींकडे कशा पद्धतीने बघतो, याबद्दल तिने सांगितले. तसेच, अभिनेत्रीने खुलासा केला की ती अनेक गोष्टीत त्याचा सल्ला घेते. मलायका म्हणाली, “त्याने मला सांगितले आहे की मी लग्न करणार नाही, त्यामुळे तुला नातवंडे असतील हा विचार सोडून दे. मी त्याला कारण विचारल्यावर तो म्हणाला की, हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ५०० किंवा १००० इतका असताना मी या जगात मुलांना का आणावं? मला असं का करावंसं वाटेल? त्यावर मला असे वाटते की तू वेडा आहेस का? तू सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजेस. अशा अनेक गोष्टींबद्दल आम्ही बोलत असतो.”
काही दिवसांपूर्वी मलायकाने पिंकविलाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने स्वत:वर प्रेम करण्याबद्दल वक्तव्य केले होते. ती म्हणालेली, “मी स्वतःवर प्रेम करते. मी माझ्या आयुष्यात दररोज हेच म्हणेन, कारण मला वाटतं की जर मी स्वतःला हे सांगितलं नाही, तर मी कधीच स्वतःमध्ये आणखी चांगले बदल करू शकणार नाही, मला हवं तसं काही करू शकणार नाही किंवा आयुष्याचा आनंद घेऊ शकणार नाही. काहीही करण्याआधी मला आधी स्वतःवर प्रेम करणं गरजेचं आहे.”
दरम्यान, मलायका अरोराने १९९८ मध्ये सलमान खानचा भाऊ अरबाज खानबरोबर लग्नगाठ बांधली होती. २००२ मध्ये अरहानचा जन्म झाला. या जोडप्याने २०१७ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.
