सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित बहुप्रतीक्षित चित्रपट ‘टायगर ३’ १२ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. मात्र, आता चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घट पाहायला मिळत आहे. ‘टायगर ३’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ४४.५ कोटींची कमाई केली होती; तर दुसऱ्या दिवशी ५९.२५, तिसऱ्या दिवशी ४४.३ कोटी, चौथ्या दिवशी २१.१ कोटी, पाचव्या दिवशी १८.५ कोटी, सहाव्या दिवशी १३ कोटी व सातव्या दिवशी १८ कोटींचा गल्ला जमवला होता.
आठव्या दिवशी म्हणजेच भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम क्रिकेट सामन्यादरम्यान चित्रपटाच्या कमाईत आणखीनच घट झाली. या चित्रपटाने आठव्या दिवशी केवल १०.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुरुवातीच्या कमाईचे आकडे पाहता, हा आकडा सगळ्यात कमी असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता वर्ल्ड कप संपला असला तरी या चित्रपटाच्या कमाईमध्ये अजिबात वाढ झालेली नाही.
आणखी वाचा : अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’मधील जबरदस्त लूक चर्चेत; रोहित शेट्टी फोटो पोस्ट करत म्हणाला, “शेर आतंक मचाता है…”
नवव्या दिवशी ‘टायगर ३’च्या एडवांस बुकिंगमध्ये ५०% घट पाहायला मिळत आहे. ‘सॅकनिल्क’च्या रीपोर्टनुसार दुसऱ्या सोमवारी दुपारपर्यंत ‘टायगर ३’ने केवळ १.९८ कोटी रुपयांची तिकीटविक्री केली. हे आकडे वाढतील अशी अपेक्षा आहे परंतु तरीही ‘टायगर ३’ दुसऱ्या सोमवारी फार फार फार तर हा चित्रपट ६ ते ८ कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आत्तापर्यंत ‘टायगर ३’ने २२९.९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे आकडे पाहता हा चित्रपट ३०० कोटींचा टप्पाही पार पारू शकेल की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. सलमानचा हा चित्रपट शाहरुख खानच्या ‘पठाण’चाही रेकॉर्ड मोडू शकणार नाही असं काहींचं म्हणणं आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान खान, कतरिना कैफबरोबर इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहे. इमरानने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि शाहरुख खानने कॅमिओ केला आहे. ‘टायगर’ व ‘टायगर जिंदा है’प्रमाणे ‘टायगर ३’मध्येही प्रेक्षकांना सलमान आणि कतरिनाचा अॅक्शन लूक बघायला मिळत आहे.