कॉमेडियन समय रैना त्याच्या वादग्रस्त नेटफ्लिक्स शो ‘इंडियाज गॉट लेटंट २’च्या नवीन एपिसोडसह परतला आहे. यावेळी त्याच्या या शोमध्ये ओरी, अर्चना पूरन सिंह, निशांत सुरी आणि शेरॉन वर्मा हे लोक उपस्थित होते. शोदरम्यान समयने अर्चना पूरन सिंह यांच्या वयावरून विनोद करत त्यांना त्यांच्या प्लास्टिक सर्जनचा नंबर देण्यास सांगितलं. एवढंच नाही तर त्याने अर्चना यांच्या हसण्यावरुनही खिल्ली उडवली. यावेळी अर्चना यांनी कपिल शर्माच्या विनोदांवर हसणं हेच सगळ्यात कठीण काम असल्याचं मान्य केलं.
समय अनेकदा त्याच्या कार्यक्रमात उपस्थित सेलिब्रिटींची मस्करी करताना दिसतो. अर्चना पूरण सिंह यांच्याबरोबरही तसंच काहीसं झालं. सेलिब्रिटीसुद्धा त्याला तसाच प्रतिसाद देतात. अर्चाना यांनीही यावेळी त्याच्याशी संवाद साधत अनेक विनोद केले. समय म्हणाला, “मी तुम्हाला पहिल्यांदा मिस ब्रेगांझाची भूमिका साकारताना पाहिलं होतं. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही तशाच आहात.तुमच्या वयात एक दिवसाचीही वाढ झालेली नाही.” अर्चना यांनी त्याचे आभार मानताच समयने मिश्कीलपणे पुन्हा त्यांची मस्करी केली.
समय रैनाने अर्चना पूरण सिंह यांची केली मस्करी
त्यावर अर्चना यांनीही समयला सडेतोड उत्तर देत म्हटलं, “अनेक दशकं वय वाढल्यानंतरही मी अशी दिसत असेन, तर माझ्याकडून काहीतरी शिका” यावर समयने लगेच “मग तुमच्या प्लास्टिक सर्जनचा नंबर द्या” असं म्हणताच अर्चना यांना हसू आवरलं नाही. यूट्यूबवर अर्चना पूरन सिंह यांचे जवळपास १३.१ लाख सबस्क्रायबर्स आहेत. २०२४ पासून त्या आपल्या कुटुंबाबरोबर व्लॉगिंग करत आहेत. यावेळी समयने प्रेक्षकांना त्यांच्या व्लॉग्सबद्दल विचारलं. त्यानंतर समयने मिश्कीलपणे अर्चना यांना टोमणा मारत म्हटलं, “मी तुमच्या व्लॉग्समध्ये पाहिलं आहे की ना तुमचे पती काम करतात, ना तुमची दोन मुलं. ते दोघेही इथे पहिल्या रांगेत बसले आहेत.”
अर्चना यांनी त्यांची मुलं आर्यमान आणि आयुष्मान यांच्याकडे पाहत म्हटलं, “मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पहिल्या रांगेत बसू नका. कारण अशा पद्धतीने प्रसिद्धी मिळत नाही, उलट तुमचा अपमान होतो.” यावर समयने लगेच विचारलं, “माहितीय प्रसिद्धी कशी मिळवायची?” आणि त्यानंतर अर्चना ज्या प्रकारे कपिल शर्माच्या शोमध्ये हसतात त्याची नक्कल करुन दाखवली त्यानंतर उपस्थित सगळेच हसू लागले.
कपिल शर्माच्या विनोदांवर हसणं सगळ्यात कठीण काम – अर्चना
समय रैनाने अर्चना पूरन सिंह यांना त्यांच्या हसण्याच्या कामाला गांभीर्याने न घेण्यावरून चिडवलं. यावर अर्चना म्हणाल्या की, “हे सगळ्यात कठीण काम आहे.” समयने लगेच विचारलं, “कपिल शर्माच्या विनोदांवर हसणं कठीण आहे?” यावर अर्चना यांनी क्षणाचाही विचार न करता “हो” असं उत्तर दिलं. मात्र, उत्तर दिल्यानंतर लगेचंच त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यानंतर समय त्यांना म्हणाला, “एकच काम आहे ते पण हातून जायचं”.
समयने अर्चना यांचे पती आणि अभिनेते परमीत सेठी यांच्यावरुनही विनोदी टोमणे मारण्याची संधी सोडली नाही. अर्चना आणि परमीत यांनी १९८८ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ‘जलवा’ (१९८७) या चित्रपटानंतर अर्चना यांना चांगली ओळख मिळाली होती, तर परमीत इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. महिलांना नेमकं काय हवं असतं, यावर बोलताना अर्चना म्हणाल्या, “मी डेटिंग करत असताना कधीच पैशाचा विचार केला नाही.” त्यावर समयने लगेच टोला लगावत म्हटलं, “हो, पण तुमच्या पतीने केला होता.” यावर अर्चना यांनी मिश्कीलपणे “कदाचित” असं उत्तर दिलं.
