Bigg Boss Fame Actress Talks About Salman Khan : बराच काळ मनोरंजनविश्वात ठराविक सौंदर्याच्या कठोर निकषांचा प्रभाव राहिला आहे. शरीरयष्टी आणि मर्यादित कल्पनांवर आधारित असलेले हे निकष अनेकदा कलाकारांना मिळणाऱ्या संधी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत. अलीकडच्या काळात शरीरयष्टी आणि स्वतःला स्वीकारण्याबाबतच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्या, तरी त्या जुन्या निकषांचे ओझे आजही पूर्णपणे कमी झालेले नाही.
अशातच आता ‘बिग बॉस’मधील माजी स्पर्धक आणि लोकप्रिय अभिनेत्रीनेही याबद्दल सांगितलं आहे. भोजपुरी चित्रपटांत यशस्वीपणे काम करणारी अभिनेत्री संभावना सेठ हिने सलमान खानचा उल्लेख करत त्याच्या एका वक्तव्यानंतर तिला त्रास झाल्याचं म्हटलं आहे.
संभावनाने सांगितला सलमान खानसह काम करण्याचा अनुभव
सलमान खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना त्याच्याबरोबर काम करायचं असतं. अशातच आता लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्रीने त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. हॉटरफ्लायशी संवाद साधताना तिने याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “बिग बॉस सीझन ४ दरम्यान जेव्हा सलमान खानने बिग बॉसचं सूत्रसंचालन करायला सुरुवात केलेली, तेव्हा आधीच्या सीझनमधील माजी स्पर्धकांनाही आमंत्रण दिलेलं. राखी आणि मी तेव्हा सादरीकरण केलेलं. मला आठवतंय सलमान खान माझ्याकडे बघून म्हणालेला, ह्या मुलीने खूप कमाल काम केलं. जेव्हा एक सुपरस्टार तुमचं कौतुक करतो तेही सगळ्यांसमोर, तेव्हा ते खूप जास्त महत्त्वाचं ठरतं.”
अभिनेता रवी किशननेसुद्धा तिची ओळख सलमान खानसह करून दिलेली, याबद्दल तिने सांगितलं आहे. ती म्हणाली, “रवी किशन सलमान खानला म्हणालेला, मला तुला एका व्यक्तीची भेट घडवून द्यायची आहे, ही संभावना आहे, भोजपुरी इंडस्ट्रीत तिचं मोठं नाव आहे आणि ती उत्कृष्ट नर्तिका आहे. त्यावर सलमान म्हणाला, हो, मी तिला पाहिलं, ती खूप छान नृत्य करते. त्यावर रवी किशन म्हणालेला, जर तुला आवडलं तर तिला काही काम असेल तर सांग आणि सलमान खान त्यावर हो नक्की असं म्हणालेला.”
सलमान खानबद्दल संभावना पुढे म्हणाली, “त्याने मला सांगितलं की माझा नंबर घे. दुसऱ्या कोणाच्याही मदतीने तुला माझ्याशी संपर्क करण्याची गरज नाही, तू थेट माझ्याशी संपर्क साधू शकतेस.”
संभावनाने पुढे सांगितलं की, तिला पुन्हा ‘बिग बॉस’कडून बोलावणं आलं आणि जसं ती ‘बिग बॉस’च्या घरात वागत होती, त्याच अॅटिट्यूडमध्ये तिला सलमान खानसमोर वावरायला सांगितलेलं. अभिनेत्री याबद्दल म्हणाली, “मला पुन्हा सादरीकरण करण्यासाठी बोलावलं गेलं. शो मेकर्सने मला मी बिग बॉसच्या घरात जशी वागायचे तसं वागायला सांगितलेलं. मी म्हटलेलं की मी त्याचा खूप आदर करते, त्यामुळे मी असं नाही करू शकत. पण, त्यांनी आग्रह धरला की सलमान खानने प्रश्न विचारले तर तुला त्याच आविर्भावात उत्तर द्यायची आहेत. मीसुद्धा तशीच उत्तरं दिली. पण मला असं वाटतं, सलमान खानला ते आवडलं नाही. मला असं वाटतं की सलमानला स्पष्टपणे आणि ठामपणे मतं मांडणाऱ्या स्त्रिया आवडत नाहीत.”
सलमान खान म्हणाला…
संभावना त्या कार्यक्रमाचा अनुभव सांगत म्हणाली, “एपिसोडचं शूटिंग संपल्यानंतर मी सलमान खानसाठी थांबले होते की तो फ्री झाला की बोलवेल म्हणून, पण तसं काही झालं नाही. मग मी स्वत: त्याला भेटायला गेले. त्याने मला मी कशी आहे याबद्दल विचारलं, तो खूप वैतागलेला आणि थकलेला वाटत होता. मी त्याला विचारलं, सलमानजी मला तुम्हाला कामाबद्दल विचारायचं होतं. त्यावर तो म्हणाला, मला असं वाटतं तुला वजन घटवावं लागेल. मला ते ऐकून धक्काच बसला की अचानक कसं सगळं बदललं. मी म्हटलं ठीक आहे, पण मला असं वाटतं की जर एखाद्याला तुम्हाला काम द्यायचं असेल तर ते देतात, तुम्ही शरीरयष्टीने कसे आहात हे पाहत नाही.”
