अभिनेत्री समीरा रेड्डी आता ग्लॅमर व बॉलीवूडच्या झगमगाटापासून दूर आहे. एकेकाळी बॉलीवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी समीरा रेड्डी आज पूर्णपणे बदलली आहे. २००० च्या सुरुवातीला जेव्हा तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यावर टिकून राहण्यासाठी तिने बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. अगदी ट्रेंड्स फॉलो करण्यापासून ते महागड्या ब्रँड्सवर पैसे खर्च करण्यापर्यंत तिची धडपड सुरू होती. २४ व्या वर्षी बॉलीवूडमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिच्यावर किती प्रचंड दबाव होता, यावर तिने भाष्य केलं आहे.

‘हॉटफ्लाय’शी बोलताना समीरा म्हणाली, “आता मी ऑरगॅनिक कपड्यांकडे वळले आहे आणि माझ्या जुन्या फॅन्सी कपड्यांना मी आता फारसा हातही लावत नाही.” मुलाखतीदरम्यान तिने तिच्या कपाटातील काही वस्तू दाखवल्या, ज्यात लग्नाआधी खरेदी केलेले २.५ लाख रुपयांचे ‘शनेल’ जॅकेटही होते.

लग्न व मुलांच्या जन्मानंतर समीराच्या लाइफस्टाइलमध्ये मोठा बदल झाला. त्याबद्दल ती म्हणाली, “जेव्हापासून मी गोव्याला शिफ्ट झाले, तेव्हापासून मी खूप शांत झाले आहे. मला आता कॉटनचे कपडे खूप आवडतात. मी आता ‘फास्ट फॅशन’ आणि मोठ्या ब्रँड्सपासून दूर गेले आहे. आता मला साधेपणाने राहणं आणि माझ्याकडे असलेल्या कपड्यांची वेगवेगळी स्टाईल करणं जास्त आवडतं.”

समीरा रेड्डीने जुन्या आठवणींना दिला उजाळा

समीरा रेड्डीने तिच्या सुरुवातीच्या काळातील लक्झरी बॅग्सच्या कलेक्शनबद्दलही सांगितलं आणि कबूल केलं की, त्यावेळी तिला शॉपिंगचं खूप वेड होतं. करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक बॅग दाखवत समीरा रेड्डी म्हणाली, “ही ‘डिओर गौचो’ (Dior Gaucho) बॅग आहे. ही २००५ सालची आहे. जेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हा मला वाटायचं की माझ्याकडे सर्व लेटेस्ट बॅग्स असाव्यात. मला आठवतंय की मी घेतलेल्या पहिल्या काही बॅग्सपैकी ही एक होती. लोकांमध्ये मिसळण्यासाठी आणि त्यांच्यासारखं दिसण्यासाठी असलेल्या दबावामुळे मी या बॅग्स विकत घेतल्या. लोक म्हणतात की त्यांना बॅग्स खूप आवडतात, पण मी या गोष्टी खरंतर यासाठी घेतल्या होत्या जेणेकरून लोकांना वाटेल की मी आता यशस्वी झाले आहे. आता जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा वाटतं की त्याऐवजी मी सोन्याचे बिस्किट विकत घेतले असते, तर त्याचा जास्त फायदा झाला असता.” या तपकिरी रंगाच्या लेदर बॅगची किंमत साधारण ३ ते ४ लाख रुपये आहे.

१३ वर्षापूर्वी मला जाणवलं की… समीरा रेड्डीचे वक्तव्य

Louis Vuitton च्या एका मोठ्या बॅगबद्दलही समीरा रेड्डीने सांगितलं. “या मोठ्या बॅगबद्दल बोलायचं झाल्यास इंडस्ट्रीतील प्रत्येकजण विमानतळावर अशा मोठ्या बॅग्स घेऊन फिरायचे. तो दबाव इतका होता की मला वाटलं माझ्याकडेही असा एक ‘एअरपोर्ट लूक’ असायलाच हवा, म्हणून मी ही बॅग घेतली. त्या काळात ‘आपल्याकडे काय आहे हे दाखवणं’ हीच मोठी गोष्ट होती. पण साधारण १३ वर्षांपूर्वी मला जाणीव झाली की, मला अशा रितीने लोकांचे लक्ष वेधून घ्यायची गरज नाही. खरी सुंदरता ही साधेपणात आणि शांत राहण्यातच आहे.” या बॅगची किंमत अंदाजे १.७ लाख रुपये आहे.

समीरा रेड्डीने २००२ ते २०१३ या काळात हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये सक्रियपणे काम केले. २०१४ मध्ये उद्योजक अक्षय वरदेशी लग्नगाठ बांधल्यानंतर ती हळुहळू फिल्म इंडस्ट्रीपासून दुरावली. आता ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील खास गोष्टी युट्यूब व्हिडीओमध्ये शेअर करत असते.