अभिनेत्री समीरा रेड्डीला अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची अजिबात इच्छा नव्हती. पहिल्या ऑडिशननंतर तिने चित्रपटसृष्टीत येण्याचा विचार जवळपास सोडूनच दिला होता. मात्र, २००० मध्ये पंकज उधास यांच्याबरोबरच्या ‘आहिस्ता कीजिए बातें’ या म्युझिक व्हिडीओमुळे तिला २००२ मध्ये ‘मैनें दिल तुझको दिया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समीराने सांगितलं की या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला ‘पॅनिक अटॅक’ यायचे.
‘हॉटरफ्लाय’शी बोलताना समीरा रेड्डीने ‘मैनें दिल तुझको दिया’ या चित्रपटातील तिचा सहकलाकार सोहेल खानबरोबरच्या पहिल्या सीनची आठवण सांगितली. “एक म्युझिक व्हिडीओ शूट केल्यानंतर मी आले आणि ते गाणं सुपरिट झालं. तेव्हा मी विचार केला होता की, ‘मला या क्षेत्रात काम नाही करायचं’. सुरुवातीच्या काळात मला खूप पॅनिक अटॅक यायचे. मी माझा पहिला चित्रपट ‘मैनें दिल तुझको दिया’ करत होते, तेव्हाचा पहिला शॉट मला आजही आठवतो. तिथे ऐश्वर्या राय आणि सलमान खान सगळे बसले होते. ते या चित्रपटाची निर्मिती करत होते आणि सोहेल खान माझ्याबरोबर सीनमध्ये होता.”
दिग्दर्शकाने अॅक्शन म्हटलं अन् अडखळली समीरा रेड्डी
समीरा पुढे म्हणाली, “मला आजही आठवतंय, मला फक्त एवढंच बोलायचं होतं की, ‘तू का जात नाहीयेस?’ पण दिग्दर्शकाने ॲक्शन म्हणताच मी तो डायलॉग अडखळत बोलले. मी इतकी घाबरले होते की माझे हात थरथरत होते आणि मला घाम फुटला होता. पण, मला माझ्या थेरपिस्टने सांगितलेली एक गोष्ट आठवली. ते म्हणाले होते, ‘तुला कशाची भीती वाटते? जर तू आज या भीतीचा सामना केला नाहीस, तर भविष्यात अशा अनेक भीतीदायक गोष्टी तुझ्यासमोर येत राहतील.’ मी आज माझ्या मुलांनाही हेच शिकवते.”
स्वतःला स्वीकारण्याबद्दल समीरा रेड्डी म्हणाली…
समीरा रेड्डी लहानपणापासून तोतरे बोलायची. स्वतःचा स्वीकार करणं आणि ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं याविषयी बोलताना समीरा म्हणाली, “मी स्वतः तोतरी असल्यामुळे, कोणी अडखळत बोलत असेल तर मला ते समजतं. बरेचदा स्वतः बोलतानाही मी अडखळणार हे मला माहित असतं, पण आता मी त्याकडे मोठी गोष्ट म्हणून पाहत नाही. मी विचार करते, तुम्ही माझ्यावर हसणार का? मग त्याने काय होतं? मी आज इथे बसले आहे आणि तुम्ही सगळे मला पाहत आहात.”
समीरा रेड्डीला तिच्या पहिल्या चित्रपटावेळी वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. ती स्क्रीनवर गोरी दिसावी यासाठी फक्त चेहराच नव्हे तर तिच्या शरीरावरही मेकअप करण्यात आला होता. आपल्या देशात महिलांना त्यांच्या वजनावरून, दिसण्यावरून बोलणं खूप सामान्य आहे. मुलींना घरात आई-वडील किंवा सासू-सासरे देखील या गोष्टीवरून टोमणे मारतात, असं समीरा रेड्डीने सांगितलं.
