बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डीने संजय दत्तच्या ‘आखरी सवाल’ या चित्रपटातून १४ वर्षांनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. याआधी समीराने २४ वर्षांपूर्वी तिच्या पहिल्या चित्रपटात म्हणजेच सोहेल खानच्या २००२ मधील ‘मैंने दिल तुझको दिया’ या ॲक्शन-रोमान्स चित्रपटात संजय दत्तबरोबर काम केलं होतं. त्या काळात वर्णभेदाचा सामना करावा लागला होता, असं समीराने सांगितलं.

समीरा म्हणाली, “माझ्या पहिल्या चित्रपटात, म्हणजेच ‘मैने दिल तुझको दिया’मध्ये माझा वर्ण दोन ते तीन शेड गोरा दाखवण्यात आला होता. मी अक्षरशः राखाडी रंगाची दिसत होते. माझा चेहरा व शरीर सारखे दिसावे, यासाठी मला पूर्ण शरीराला मेकअप करावा लागायचा. तुम्हाला माहीत आहे का, कितीतरी महिलांना त्यांच्या स्वतःच्या घरात या गोष्टीचा सामना करावा लागतो? तिचे स्वतःचे आई-वडील आणि सासरचे लोक म्हणतात, ‘तू काळी आहेस किंवा जाडी आहेस.’ हा किती मूर्खपणा आहे. सौंदर्याची ही व्याख्या नक्की कोणी तयार केली आहे?”

स्वतःला स्वीकारायला २० वर्षे लागली – समीरा रेड्डी

समीरा रेड्डीने पुढे सांगितलं की, तिला तिच्या दिसण्यावरून न्यूनगंड होता आणि त्यावर मात करण्यासाठी तिला २० वर्षांपेक्षा जास्त काळ लागला. ‘हॉटरफ्लाय’शी बोलताना ४७ वर्षीय समीरा म्हणाली, “मला पडद्यावर काय दाखवायचं आहे, मी कशाची प्रसिद्धी करत आहे आणि मी प्रत्यक्षात कोण आहे, या सगळ्या गोंधळातून बाहेर पडायला माझी चाळीशी यावी लागली. मला स्वतःला स्वीकारायला २० वर्षे लागली, कारण इतकी वर्षे मी फक्त पॅडेड ब्रा, नितंबांसाठी पॅड्स आणि कलर्ड लेन्स वापरत होते.”

हिरोंची उंची कमी असायची त्यामुळे… समीरा रेड्डीचा खुलासा

समीरा पुढे म्हणाली, “मी लहानपणापासूनच थोडीशी जाड होते. मग जेव्हा मी माझं वजन कमी केलं, तेव्हा लोक मला म्हणायचे, ‘तुझे नितंब खूप सपाट आहेत.’ आता मला या गोष्टींवर हसायला येतं. पण वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत मी कोण आहे, असा विचार करून स्वतःशीच संघर्ष करत होते. कारण मी फार गोरी नव्हते, माझे डोळे सुंदर नव्हते आणि माझी उंचीही खूप जास्त नव्हती. अनेकदा माझ्या हिरोंची उंची कमी असायची, त्यामुळे मी खांदे पाडून किंवा झुकून चालायचे. पण आता मला विचार येतो की, ‘भावा हा तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही! तू हिल्स घाल!’ पण त्या काळात ही खूप मोठी अडचण मानली जायची. अशा वेळी लोक काय करायचे? तर अभिनेत्रीला सतत कमी लेखायचे आणि तिला वाईट वाटेल असं वागायचे.”

समीरा रेड्डीने तिला आलेले वाईट अनुभव सांगितले. अगदी महिला सहाय्यक दिग्दर्शकदेखील तिच्या शरीरयष्टीवरून तिला टोमणे मारायच्या. “अगदी कपडे डिझाईन करणाऱ्यांनीही मला अगदी सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की, याबद्दल काहीतरी कर. त्यामुळे माझ्या सर्व कपड्यांना आतून आधीच पॅड्स लावलेले असायचे. खरं सांगायचं तर, माझ्याकडे अशा पॅड्सचं खूप मोठं कलेक्शन होतं. ‘समीरा, आम्ही तरी आणखी किती पॅड्स लावरणार? तू स्वतःच यावर काहीतरी कायमचा उपाय का करत नाहीस? त्यासाठी काय फार खर्च थोडीच येणार आहे?’ असंही डिझायनर्स म्हणायचे,” असं समीर रेड्डी म्हणाली.

समीरा रेड्डीने काही वर्षांपूर्वी बिझनेसमन अक्षय वरदे यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ते गोव्यात राहतात.