Sameera Reddy on Mother In Law: बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे व्हिडीओ, फोटो लक्ष वेधून घेतात. तिच्या व्हिडीओंमधून तिच्या लाईफस्टाईलची झलक पाहायला मिळते. त्याबरोबरच, समीरा अनेकदा तिच्या सासूबाईंबरोबर म्हणजे मंजिरी वर्दे यांच्याबरोबरचे विनोदी व्हिडीओ शेअर करीत असते. त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता मात्र अभिनेत्री तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

सासूबद्दल समीराचे वक्तव्य

बंगळुरूमधील FICCI FLO या कार्यक्रमात समीरा रेड्डी व तिची सासू मंजिरी वर्दे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अभिनेत्री तिच्या सासूबद्दल म्हणाली, “जेव्हा मी त्यांना भेटले, त्यावेळी त्यांचा घटस्फोट झाला होता. माझे सासरे त्यांच्या आयुष्यात पुढे गेले होते. त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. माझ्या सासूबाईंनी मला याबद्दल कधी सांगितलं नव्हतं; पण तरीही मला हे माहीत होतं की, त्यांना कशाचा तरी त्रास होत आहे.” समीराच्या या वक्तव्यावर सहमती दर्शवीत मंजिरी म्हणाल्या, “याचा आपल्यापैकी प्रत्येकाला त्रास होतो. सिंगल असणं सोपं नाही.”

समीरा पुढे म्हणाली, “घटस्फोटित महिलांना अनेकदा वेगळी वागणूक मिळते. काही वेळा टीकेचाही सामना करावा लागतो. पण, आयुष्य फक्त एकदाच मिळतं आणि जर फक्त समाजासाठी जगत राहिलो, तर स्वतःसाठी काहीच उरणार नाही. मी माझ्या सासूबाईंना हेच सांगितलं होतं की, तुम्ही एकट्या असाल आणि रडत असाल त्यावेळी कोणीही तुमचा हात धरून तुम्हाला धीर देण्यासाठी पुढे येणार नाही. तुम्हाला तुमचं आयुष्य स्वत:च घडवायचं आहे.”

या सगळ्यात माझ्या सासऱ्यांचा अपमान करणं असा माझा कधीच उद्देश नव्हता; पण सासूबाईंनी स्वत:चा वेगळा मार्ग निवडावा, असं वाटत होतं. कोणासाठीही स्वतःला कमी लेखू नका किंवा स्वतःचं अस्तित्व गमावू नका, असेही समीरा म्हणाली.

अभिनेत्रीने याआधी ‘हॉटरफ्लाय’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत ती सासू मंजिरी वर्दे यांच्याबद्दल म्हणालेली, “माझ्या सासूनं कायम माझी बाजू घेतली. माझा मुलगा, असं त्या म्हणत बसल्या नाहीत. त्या मला नेहमी विचारत असत की, तू ठीक आहेस ना? तुला कशाची गरज आहे का? त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर आहे.”

दरम्यान, समीराने मराठी उद्योजक अक्षय वर्दे यांच्याबरोबर २०१४ ला लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले आहेत.