अभिनेता समीर सोनी व अभिनेत्री नीलम कोठारी आता आनंदाने संसार करत आहेत. पण आधीच्या घटस्फोटांनंतर पुन्हा प्रेमात पडणं सोपं नव्हतं. समीरचं पहिलं लग्न मॉडेल राजलक्ष्मी खानविलकरशी झालं होतं. अवघ्या सहा महिन्यांत दोघांचा घटस्फोट झाला होता. तर नीलम कोठारीने उद्योगपती ऋषी सेठियाशी लग्न केलं आणि लंडनला निघून गेली होती, पण घटस्फोटानंतर ती मुंबईला परत आली.

समीर सोनीला १९९५ च्या ‘समुंदर’ शोमुळे लोकप्रियता मिळाली होती. नंतर चायना गेटमध्ये त्याने काम केलं. या चित्रपटात ममता कुलकर्णीदेखील होती. पण त्याचा पहिला चित्रपट त्याच्यासाठी एक दुःखद आठवणीने भरलेला होता. “माझा पहिला चित्रपट रिलीज झाला तेव्हा सकाळी मी घटस्फोटाचे कागद आणायला कोर्टात गेलो होतो आणि संध्याकाळी माझ्या पहिल्या चित्रपटाचं प्रिमियर होतं. मला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. ती माझ्या आयुष्यातली खूप मोठी रात्र होती. माझे आई-वडील दिल्लीहून आले होते. मी सकाळी कुठे गेलो होतो, ते मी त्यांना सांगितलं नव्हतं. मला त्यांचा मूड खराब करायचा नव्हता. ते सगळं भयंकर होतं,” असं समीर सोनी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

आई-वडिलांना सांगण्याची हिंमतच झाली नाही – समीर सोनी

समीर सोनीने प्रिमियरनंतर घटस्फोटाबद्दल सर्वात आधी त्याचे को-स्टार नसीरुद्दीन शाह यांना सांगितलं होतं. “माझ्या आई-वडिलांना सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती. त्यानंतर चित्रपटातील माझी भूमिका कापली होती, त्यामुळे मी मानसिकृष्ट्या पूर्णपणे खचलो होतो. चित्रपट रिलीजहोण्याआधी मला खूप ऑफर्स येत होत्या, पण रिलीजआधी ऑफर स्वीकारायच्या नाही असं मला सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र माझी भूमिका कापली होती,” असं समीर सोनीने सांगितलं.

नीलमसाठी घटस्फोट जास्त कठीण होता – समीर सोनी

समीरच्या घटस्फोटाच्या काळातच त्याच्या करिअरलाही मोठा फटका बसला होता. पण तरीही घटस्फोटानंतरचा काळ नीलमसाठी अधिक कठीण होता, असं समीरला वाटतं. “माझ्यापेक्षा नीलमसाठी हा काळ जास्त कठीण होता, कारण लग्नासाठी तिला तिचं घर आणि देश सोडावा लागला होता. तिने काम सोडलं आणि अनोळखी ठिकाणी गेली होती. त्या तुलनेत मी किमान माझ्या ओळखीच्या लोकांमध्ये होतो,” असं समीर सोनी म्हणाला.

Samir Soni Neelam Kothari Marriage
समीर सोनी व नीलम कोठारीच्या लग्नाचा फोटो (सौजन्य – इन्स्टाग्राम)

घटस्फोटानंतर गायब झालेली नीलम कोठारी

घटस्फोटाबद्दल नीलम म्हणाली, “मुंबईत परत आल्यानंतर मी एक वर्ष पूर्णपणे गायब झाले होते. मी कोणालाही भेटत नव्हते, कोणाशीही बोलत नव्हते. माझा घटस्फोट झालाय, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. कारण प्रत्येक मुलगी लग्न करताना अनेक स्वप्ने पाहते, मीही पाहिली होती पण माझं लग्न टिकलं नाही. मुंबईत परत आल्यानंतर लोकांचा सामना कसा करू तेच मला कळत नव्हतं. मी आयुष्यात अपयशी झालेय, अशी भावना माझ्या मनात तयार झाली होती.”

नीलम घटस्फोटाबद्दल गप्प होती, पण लोक मात्र घटस्फोटाला नक्की ती जबाबदार होती की तिचा माजी पती, याबद्दल अंदाज बांधत होते. तिला तिच्या काही मित्रांनी या परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत केली. नीलम आठवण सांगताना म्हणाली, “एकता कपूर माझी चांगली मैत्रीण होती, तिला मी माझी लहान बहीणच मानते. तिने माझे चांगले-वाईट दिवस आणि संपूर्ण आयुष्य जवळून पाहिले आहे. माझी मैत्रीण शबीनासुद्धा माझ्यासाठी मोठा आधार होती. आणि त्यानंतर १० वर्षांनी मला समीर भेटला.”

Samir Soni Neelam Kothari Marriage
समीर सोनी व त्याची पत्नी नीलम कोठारी (फोटो- इन्स्टाग्राम)

नीलम कोठारी व समीर सोनीची पहिली भेट

एकतामुळेच नीलम व समीरची पहिली भेट झाली होती. दोघांचंही फ्रेंड सर्कल खूप वेगळं होतं, त्यात एकता कॉमन होती. “मला रिलेशनशिपची खूप भीती वाटत होती. मी जर नात्यात आले तर ते कायमस्वरुपी असावे, असं मला वाटत होतं,” असं नीलमने सांगितलं. तर समीर म्हणाला, “दोघांचीही आधीची लग्ने खूप कमी काळ टिकली होती. खूप त्रास झाला होता, त्यामुळे आम्ही घाबरलो होतो. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड वगैरे काही नाही. लग्न करायचं असेल तरच नात्यात यायचं असं आम्ही ठरवलं होतं.”

Samir Soni First Marriage Rajlakshmi Khanvilkar
समीर सोनी, त्याची पत्नी नीलम कोठारी व मुलगी अहाना (फोटो- इन्स्टाग्राम)

दरम्यान, जवळपास ५ वर्षे नात्यात राहिल्यानंतर समीर व नीलम यांनी २०११ साली लग्न केलं. त्यांनी २०१३ मध्ये एक मुलगी दत्तक घेतली. तिचं नाव अहाना सोनी आहे.