Sanam Bewafa Actress Chandni Career: बॉलीवूडमध्ये एका रात्रीत स्टार होण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात, पण मिळालेले यश टिकवणे सर्वांनाच जमते असे नाही. सलमान खानच्या ‘सनम बेवफा’ या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री चांदनी (Chandni) उर्फ नवोदिता शर्मा हिच्या बाबतीत असेच काहीसे घडले. १९९१ मध्ये या चित्रपटाने १२ कोटींची कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, दिग्दर्शक सावन कुमार टाक यांच्यासोबत केलेल्या ३ वर्षांच्या ‘एक्स्क्लुझिव्ह कॉन्ट्रॅक्ट’मुळे तिला इतर कोणत्याही मोठ्या बॅनरचे चित्रपट स्वीकारता आले नाहीत. या एका करारामुळे तिचे ऐन भरात असलेले करिअर रुळावरून घसरले आणि अखेर तिला सिनेसृष्टी सोडावी लागली.
चांदनी अत्यंत सुंदर होती. तिचा स्क्रीन प्रेझेन्स आणि अभिनय प्रेक्षकांना वेड लावायचे. इतर ‘स्टार किड्स’प्रमाणे तिच्या कुटुंबातलं कोणीही इंडस्ट्रीत नव्हती. तिची फार ओळख नव्हती आणि या स्पर्धात्मक इंडस्ट्रीत तिला मार्गदर्शन करणारा कोणी ‘गॉडफादर’ही नव्हता. अशातच तिच्या एका निर्णयाने तिचं नुकतंच सुरू झालेलं करिअर संपलं.
करिअर संपवणारा करार
‘तबस्सूम टॉकीज’च्या माहितीनुसार, चांदनीने ‘सनम बेवफा’चे दिग्दर्शक सावन कुमार टाक यांच्यासोबत तीन वर्षांचा एक ‘एक्स्क्लुझिव्ह कॉन्ट्रॅक्ट’ म्हणजेच करार केला होता. या करारानुसार, त्या काळात तिला इतर कोणत्याही निर्मात्याबरोबर काम करण्यास मनाई होती. तिला वाटलं की हा करार तिच्यासाठी एक मोठी संधी आहे, पण तोच करार तिचं करिअर संपवणारा ठरला.
पण पुढे काय घडलं, माहितीये? करार करणाऱ्या सावन कुमार टाक यांनी त्या तीन वर्षांत चांदनीबरोबर दुसरा कोणताही चित्रपट बनवला नाही. दुसरीकडे, या करारामुळे तिला इतर कोणाबरोबर काम करता येत नव्हतं. नवनवीन संधी हातातून निसटत गेल्या आणि तिची लोकप्रियता हळूहळू कमी होऊ लागली. जेव्हा तिने हा करार संपवण्याची विनंती केली, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि तिचं मोठं नुकसान झालं होतं.
करिअर संपल्यावर चांदनीने घेतला मोठा निर्णय
चांदनीचा हा करार संपेपर्यंत बॉलीवूड बरंच पुढे निघून गेलं होतं. ज्या अभिनेत्रीला भविष्यातील ‘सुपरस्टार’ मानलं जात होते, तिला आता साईड रोल करावे लागत होते आणि इतर नवीन अभिनेत्रींनी तिची जागा घेतली होती. तिने पुढे अक्षय कुमार आणि अनिल कपूर यांसारख्या बड्या अभिनेत्यांबरोबर काम केलं, पण त्या भूमिकांमध्ये पूर्वीसारखी चमक उरली नव्हती. हिरोईन बनण्याचं तिचं स्वप्न करारामुळे भंगलं. बॉलीवूडमधील करिअर आता अपेक्षेप्रमाणे पुढे जाणार नाही, याची जाणीव झाल्यावर चांदनीने एक मोठा निर्णय घेतला. तिने अमेरिकेतील बिझनेसमन सतीश शर्मा यांच्याशी लग्न केले आणि ती कायमची फ्लोरिडाला निघून गेली.

चांदनीने बॉलीवूड सोडून निवडलं वेगळं करिअर
लग्नानंतरही चांदनी ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’ आणि ‘इक्के पे इक्का’ सारख्या काही सिनेमात दिसली, पण त्याचा करिअरला फायदा झाला नाही. मग तिला काम मिळणं बंद झालं. मात्र, चांदनीने हार मानली नाही. ती एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना होती, त्यामुळे तिने एका पूर्णपणे नवीन देशात स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. तिथे तिने आपले मूळ नाव नवोदिता शर्मा वापरण्यास सुरुवात केली. तिने फ्लोरिडामध्ये ‘सी स्टुडिओज’ (C Studios) नावाची स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली आणि बॉलीवूडच्या झगमगाटापासून दूर आपले करिअर केले. आपल्या अकॅडमीत ती डान्सचे विविध प्रकार शिकवले.
चांदनीच्या आताच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून डान्स अकॅडमी चालवत आहे. तिच्या अकॅडमीतील विद्यार्थी डिस्ने, युनिव्हर्सल स्टुडिओमधील ‘हार्ड रॉक लाईव्ह’, विविध लग्न सोहळे, मोठे कार्यक्रम आणि अगदी ‘NBA’ (बास्केटबॉल) सामन्यांच्या ठिकाणीही आपला डान्स सादर करतात.
