Sandhya Shantaram V Shantaram Marriage Navrang Movie Secret: मराठी व हिंदी सिनेविश्वामध्ये आपल्या अभिनय, नृत्य आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे संध्या शांताराम. त्यांच्या अभिनयाने त्यांच्या भूमिकांना अजरामर बनवले, पण त्यांनी पूर्ण करिअरमध्ये एकाच दिग्दर्शकांबरोबर काम केले, ते म्हणजे व्ही शांताराम. दिग्गज चित्रपट निर्माते आणि अभिनेते व्ही. शांताराम यांच्या त्या तिसऱ्या पत्नी होत्या.
१९३२ ला कोचीमध्ये जन्मलेल्या संध्या यांचे लग्नापूर्वीचे नाव विजया देशमुख होते. त्यांचे कुटुंबही नाट्यक्षेत्राशी संबंधित होते. संध्या यांचे वडील बॅकस्टेजला तर बहीण नाटकांमध्ये काम करत होत्या, त्यामुळे संध्या यांचे लहानपणापासूनच रंगभूमीशी जवळचे नाते होते. पण, त्यांना सिनेमांमध्ये काम करण्याचे वेध लागले होते. १९५१ मध्ये त्यांची भेट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्याशी झाली. त्यांच्या आवाजात शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी जयश्री यांच्या आवाजाशी साम्य होते. याच कारणामुळे शांताराम यांनी त्यांना चित्रपटात संधी दिली आणि संध्या या नावासह ‘अमर भूपाळी’ या मराठी चित्रपटातून त्यांच्या सिनेविश्वातील प्रवासाला सुरुवात झाली.
संध्या शांताराम यांचे ‘हे’ सिनेमे प्रचंड गाजले
विशेष म्हणजे, संध्या यांनी पूर्ण कारकिर्दीमध्ये केवळ व्ही. शांताराम यांच्याबरोबरच काम केले होते. संध्या यांनी नृत्याचं कोणतंही औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नव्हते, तरीही त्यांचे नृत्यातील वेगळेपण आणि प्रभावी अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. पुढे त्यांनी ‘पर्चाई’, ‘तीन बत्ती चार रास्ता’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘सेहरा’ आणि ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ‘स्त्री’मध्ये त्यांनी व्ही. शांताराम यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती, पण त्यांची ‘नवरंग’मधील भूमिका अजरामर ठरली आणि त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली.

१९५६ मध्ये संध्या आणि व्ही. शांताराम यांनी लग्न केलं. लग्नानंतर काही वर्षांनी व्ही. शांताराम यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ लागला. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आणि त्यावेळी त्यांची पूर्ण काळजी संध्या यांनी घेतली. शस्त्रक्रियेनंतर व्ही. शांताराम यांनी डोळे उघडले तेव्हा खोलीत ठेवलेली रंगीबेरंगी फुले पाहून त्यांना ‘नवरंग’ची कल्पना सुचली. १९५९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट संध्या यांच्या कारकिर्दीतील सर्वांत लोकप्रिय सिनेमा ठरला.


व्ही. शांताराम यांना शेवटपर्यंत संध्या यांनी साथ दिली. या जोडप्याला त्यांचे अपत्य नसले तरी व्ही शांताराम यांच्या आधीच्या पत्नीपासून असलेल्या मुलांना संध्या यांनी खूप जीव लावला आणि स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांचा सांभाळ केला.
