Sanjay Dutt Jail Experience: बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने आपल्या तुरुंगवासाच्या काळातील हृदयद्रावक आठवणींना उजाळा दिला आहे. शेखर सुमन यांच्याशी संवाद साधताना संजयने ‘अंडा सेल’मध्ये घालवलेले दिवस, तुरुंग प्रशासनाकडून मानसिकदृष्ट्या तोडण्याचे झालेले प्रयत्न आणि वडिलांच्या डोळ्यांत आलेले अश्रू यावर भाष्य केले. २४ वर्षे चाललेल्या न्यायालयीन लढ्यात आणि तुरुंगात स्वतःला कसे खंबीर ठेवले, याबद्दल त्याने काय खुलासा केला, ते जाणून घेऊयात.

शेखर सुमन म्हणाले, “संजय दत्तला ‘अंडा सेल’मध्ये ठेवण्यात आलं होतं, तरीही त्याने स्वतःचं मानसिक संतुलन ढळू दिलं नाही.” त्यानंतर त्यांनी त्याला “अशा परिस्थितीत तुला कधी जीव द्यावासा वाटला का?” असं विचारलं. त्यावर “कधीच नाही” असं उत्तर संजयने दिलं.

लोक अनेकदा आपल्या चुका मान्य करत नाहीत, पण संजय दत्तने स्वतःच्या चुका स्वीकारल्या होत्या असं म्हणत त्यांनी विचारलं, “असा कोणता क्षण होता जेव्हा तुला स्वतःला सर्वात कमकुवत वाटलं?” संजय म्हणाला, “मला माहीत होतं की माझे वडील आणि माझे कुटुंबीय बऱ्याच गोष्टींचा सामना करत होते, पण मला कधीच कमकुवत वाटलं नाही.” त्यावर शेखर यांनी विचारलं, “तू नेमका कशाचा बनला आहेस?” त्यांनी संजयच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितले. “त्याने आई गमावली, वडील गमावले, पहिली पत्नी गमावली. तो व्यसनमुक्ती केंद्रात गेला, त्याने कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर मात केली आणि तो अनेकदा तुरुंगात गेला, तरीही तो आजही ठामपणे उभा आहे.”

मी खचलो होतो, पण खंबीर राहावं लागलं – संजय दत्त

संजय दत्तने वडील सुनील दत्त यांच्यासमोर त्याला बेड्या ठोकल्या गेल्या, तो प्रसंग सांगितला. “जेव्हा पहिल्यांदा पोलीस आले आणि त्यांनी मला बेड्या घातल्या, तेव्हा माझ्या वडिलांना धक्का बसला. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. ते म्हणाले, ‘तुम्ही माझ्या मुलाबरोबर हे काय करताय?’ मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, ‘तुम्ही या बेड्यांमुळे स्वतःला त्रास का करून घेताय? असं नका करू. ही फक्त एक प्रक्रिया आहे, प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.’ खरं तर त्यावेळी मी आतून खचत होतो, पण मला त्यांच्यासाठी खंबीर राहावं लागलं. अशा प्रकारे मी या खटल्यात स्वतःला सावरलं. हा खटला तब्बल २४ वर्षे चालला,” असं संजय दत्त म्हणाला.

संजय दत्त कोठडीत इतर गुन्हेगारांबरोबर राहिला. आपल्याला स्टारडम आणि श्रीमंतीचा कधीच अहंकार नव्हता आणि स्वतःला इतरांपेक्षा वेगळं किंवा श्रेष्ठ समजलं नाही, असं त्याने नमूद केलं. “बघा, मी इतक्या वर्षांपासून स्टार आहे पण माझ्यामध्ये माझ्या स्टारडमचा अहंकार नाही. तो माझा स्वभावच नाही,” असं तो म्हणाला.

तुरुंग प्रशासनाला वाटत होतं की संजय दत्त सेलिब्रिटी आहे, त्यामुळे त्याच्या सर्व सोयीसुविधा हिरावून घेतल्यास तो मानसिकदृष्ट्या खचेल. “पण मला काहीच फरक पडला नाही. कारण मी खचलो नाही. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. ते माझी खिल्ली उडवायचे. त्यांच्यातील एक जण माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘तुला इथे सिगारेट मिळणार नाही, आता काय करशील?’ त्यावर मी म्हणालो, ‘सर, इथे बीडी तर मिळेल ना?'” अशी आठवण त्याने सांगितली.

संजय दत्तचा तुरुंगवास

संजय दत्तला १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याप्रकरणी १९ एप्रिल १९९३ रोजी पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्याच्यावर टाडा कायदा आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. ऑक्टोबर १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळण्यापूर्वी संजयने १८ महिने तुरुंगात घालवले. २००७ मध्ये, एका विशेष टाडा न्यायालयाने त्याला दहशतवादाशी संबंधित आरोपांतून मुक्त केलं, पण शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवून ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. २०१३ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम ठेवली, पण ती ६ वर्षांवरून कमी करून ५ वर्षे केली. उर्वरित शिक्षा पूर्ण करण्यासाठी संजय दत्तने त्याच वर्षी मे महिन्यात आत्मसमर्पण केलं आणि चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला सूट देण्यात आली आणि २५ फेब्रुवारी २०१६ रोजी पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातून त्याची सुटका झाली.