Sanjay Dutt Success Story: या बॉलीवूड अभिनेत्याचं करिअर खूपच चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. त्याने २००३ ते २००६ या तीन वर्षांत सलग १५ फ्लॉप चित्रपट दिले. पण एका चित्रपटाने त्याचं करिअर वाचवलं. त्यानंतर आता तो हिरो नव्हे तर व्हिलन म्हणून सिनेमे गाजवतोय. हा अभिनेता म्हणजे सुनील दत्त व नर्गिस यांचा मुलगा संजय दत्त होय.

करिअरमधील सर्वात कठीण काळ

संजय दत्तसाठी २००३ ते २००६ हा काळ संघर्षाचा होता. या काळात त्याचे ‘एलओसी कारगिल’, ‘प्लॅन’, ‘रुद्राक्ष’ आणि ‘शादी नंबर १’ सारखे सलग १५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सारखा मोठा हिट चित्रपट दिल्यानंतर लगेचच आलेल्या या फ्लॉप सिनेमांमुळे संजय दत्तचे करिअर संपल्यात जमा होते. मात्र, याच चित्रपटाचा सीक्वेल ‘लगे रहो मुन्नाभाई’ने त्याला तारलं आणि त्याने दमदार पुनरागमन केलं.

संजय दत्तला करिअरच्या सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला. १९८१ मध्ये ‘रॉकी’ मधून पदार्पण केल्यानंतरही त्यांना सुरुवातीला अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं होतं. ‘जॉनी आय लव्ह यू’ आणि ‘मेरा फैसला’, ‘बेकरार’ सारखे चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकू शकले नाही.

Award Banner

करिअरच्या सुरुवातीलाही करावा लागला संघर्ष

१९८६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाम’ हा चित्रपट त्याच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटाने त्याला रातोरात सुपरस्टार बनवलं आणि लोक त्याच्या अभिनयाला गांभीर्याने घेऊ लागले. हा चित्रपट त्याच्या बहिणीचे सासरे राजेंद्र कुमार यांनी प्रोड्यूस केला होता. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना संजय दत्तचे ‘दोस्ताना’ आणि ‘किस्सा कारतूस’ सारखे अनेक मोठे प्रकल्प काही कारणास्तव पूर्ण होऊ शकले नाहीत. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने ‘मेरा जूता है जापानी’ मधून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो चित्रपटही मध्येच रखडला.

हिरो म्हणून फ्लॉप, व्हिलन म्हणून गाजवले चित्रपट

संजय दत्तची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याने काळाप्रमाणे स्वतःला बदललं. जेव्हा हिरो म्हणून त्याचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले, तेव्हा त्याने खलनायकाच्या भूमिका करायचं ठरवलं. २०१२ मधील ‘अग्निपथ’ मधील ‘कांचा चीना’ आणि २०२२ मधील ‘के जी एफ २’ मधील ‘अधीरा’ या भूमिकांमधूूून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

संजय दत्तच्या करिअरमध्ये चढ-उतार आले. २०२२ मध्ये त्याच्या ‘केजीएफ 2’ ने कमाईचे रेकॉर्ड मोडले. पण ‘शमशेरा’ व ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप ठरले. सध्या संजय दत्त यांचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने जगभरात १४०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. यात त्याने ‘चौधरी असलम’ ही जबरदस्त भूमिका साकारली आहे.