Sanjay Dutt On Jail Life: अभिनेता संजय दत्तने त्याच्या चार दशकांच्या दीर्घ करिअरमध्ये फिल्म इंडस्ट्रीत झालेले अनेक बदल जवळून अनुभवले आहेत. ‘AIG हॉस्पिटल्स’च्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तने बॉलीवूडच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले. जेव्हा करिअर सुरू केले तेव्हा ही इंडस्ट्री एका कुटुंबासारखी होती, पण आता इथे अत्यंत जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे, पण याउलट हॉलीवूडमध्ये कलाकारांमध्ये प्रचंड एकजूट असल्याचे त्याने सांगितले. त्याचबरोबर तुरुंगात असताना एका हवालदाराने दिलेला महत्त्वाचा धडाही त्याने सांगितला.

बॉलीवूडमधील सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढत संजय दत्त म्हणाला, “मी जेव्हा करिअरला सुरुवात केली होती, तेव्हा ही इंडस्ट्री एका कुटुंबासारखी होती. सगळे एकत्र असायचे आणि एकमेकांना मदत करायचे. पण आता इथे अत्यंत जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. हॉलीवूड मात्र आपल्यापेक्षा खूप वेगळे आहे.”

हॉलीवूडमधील एकीबद्दल संजय दत्तचं वक्तव्य

हॉलीवूडचं कौतुक करत संजय दत्त म्हणाला, “तिकडे खूप एकजूट आहे. कलाकार, लेखक एकमेकांना पाठिंबा देतात. तिथे अनेक संस्था कार्यरत आहेत. अगदी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही ही एकी दिसून येते. तिथे एखादा अभिनेता पुरस्कार स्वीकारत असतो, तेव्हा कोणाच्याही मनात असूया नसते आणि सर्वजण एकमेकांचा आनंद साजरा करतात. हे सगळं खूप सुंदर आहे.”

जेलमध्ये असताना माफ करायला शिकला संजय दत्त

संजय दत्तने तुरुंगात असताना सर्वात मोठी शिकवण कोणती मिळाली, ते सांगितलं. एका हवालदाराने त्याला माफ करण्याचं महत्त्व शिकवलं. “माफ करणं… ही गोष्ट मी जेलमध्ये असताना शिकलो. एका हवालदाराने मला ही गोष्ट खूप छान समजावून सांगितली. तो म्हणाला, ‘लोकांना माफ करायला शिका, तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल.’ समोरच्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलंय हे माहीत असूनही तुम्ही त्याला माफ करता, हाच खरा मोठेपणा आहे,” असं संजय दत्त म्हणाला.

संजय दत्तला गँगस्टरच्या भूमिका करायला आवडतात

संजय दत्तने सांगितलं की त्याला गुंडांच्या भूमिका करायला आवडतं. तसेच कोणत्याच भूमिकेसाठी विशिष्ट तयारी करत नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. “मी विशेष काही करत नाही. मी फक्त कथा ऐकतो, सेटवर जातो आणि दिग्दर्शक जसा सीन सांगेल, तसा तो पूर्ण करतो,” असं संजय दत्तने स्पष्ट केलं.