Sanjay Dutt Madhuri Dixit Unheard Story: धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या प्रेमाची आणि अचानक झालेल्या ब्रेकअपची गोष्ट आजही सिनेसृष्टीत चर्चेत असते. ९० च्या दशकात पडद्यावर आणि पडद्यामागे गाजलेल्या या जोडीबद्दल ज्येष्ठ सिनेपत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी काही खुलासे केले आहेत. ‘खलनायक’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान म्हैसूरमधील एका हॉटेलमधील पार्टीतून संजय आणि माधुरी दोघेही गायब झाले होते, त्याबद्दलही त्यांनी सांगितलं.

ज्योती व्यंकटेश यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्त व माधुरी दीक्षितच्या ‘खलनायक’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा किस्सा सांगितला. या चित्रपटाचं म्हैसूरमध्ये शूटिंग सुरू असताना सुभाष घई यांनी पत्रकारांना तिथे बोलावलं होतं. ज्योती व्यंकटेश तिथेच माधुरी व संजयला भेटले होते.

पार्टीमधून गायब होते संजय-माधुरी

“संध्याकाळी पार्टी होती. आम्ही सगळे हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेलो. तिथे मी पाहिलं की फक्त जॅकी श्रॉफ आणि सुभाष घई बसलेले होते. सुभाषजी मला म्हणाले, ‘अरे, ड्रिंक्स सुरू करा ना!’ मी म्हणालो, ‘मी संजू आणि माधुरी येण्याची वाट पाहतोय.’ त्यावर जॅकी म्हणाले, ‘संजू आणि माधुरी येणार नाहीत, ते बिझी आहेत’,” असं ज्योती यांनी सांगितलं. एबीपी लाइव्हने हे वृत्त दिलंय.

ज्योती पुढे म्हणाले, “मला विचार आला की मी आऊटडोअर कव्हरेजसाठी आलोय आणि ते दोघे पार्टीत का आले नाहीत? दोघे शेवटपर्यंत आलेच नाही, नक्की काय करत होते हे मला माहीत नाही. सिनेसृष्टीत लोक एकत्र येतात आणि वेगळे होतात. ही त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा संजय आणि माधुरी एकमेकांच्या खूप जवळ होते.”

संजय आणि माधुरीमध्ये दुरावा का आला?

संजय व माधुरी यांच्यात इतकी जवळीक होती, तर मग त्यांच्यात दुरावा का आला? असं ज्योती यांना विचारण्यात आलं. ते म्हणाले, “दुरावा येण्याचं कारण म्हणजे संजय दत्त आपल्या शब्दावर ठाम नव्हता. माधुरीला वाटत होतं की तो तिच्याशी लग्न करेल, पण संजय आधीच एकदा अयशस्वी लग्नातून बाहेर पडला होता. त्यामुळे त्याला पुन्हा लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं.” खरं तर त्यावेळी संजय दत्त आधीच विवाहित होता. १९८७ मध्ये त्याने अभिनेत्री रिचा शर्माशी लग्न केलं होतं, पण त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. १९९६ मध्ये कर्करोगाने रिचाचं निधन झालं.

मुंबई बॉम्बस्फोटात आलेलं संजय दत्तचं नाव

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदेशीर शस्त्रे ठेवल्याप्रकरणी संजय दत्तला अटक झाली होती आणि त्याला तुरुंगवासही झाला होता. त्या वेळी संजय दत्तवर टाडा (TADA) आणि इतर अनेक आरोप लावण्यात येत होते, त्यामुळे माधुरी त्याच्यापासून दूर झाली का? असं विचारल्यावर ज्योती म्हणाले, “होय. त्यानंतर माधुरीला त्याच्यापासून दूर जायला एक चांगलं कारण मिळाले. एक तर संजय लग्नाबद्दल निर्णय घेत नव्हता आणि त्यातच तो कायदेशीर कचाट्यात अडकला होता. त्यानंतर माधुरी संजयपासून दूर गेली.”

संजयला पाहताच माधुरी दीक्षित पार्टीतून निघून गेलेली

संजय आणि माधुरीच्या नात्याबाबत याआधीही अनेकांनी टिप्पण्या केल्या आहेत. लेखक आणि पत्रकार हनीफ जावेरी यांनी २०२५ मधील एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला होता. जेव्हा बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता, तेव्हा दिग्दर्शक अफझल खान यांनी एक पार्टी ठेवली होती. या पार्टीला माधुरीही आली होती. पण, पार्टीत संजयची एन्ट्री होताच माधुरी लगेचच पार्टी सोडून निघून गेली होती. “माधुरी का निघून गेली हे मला माहीत होतं. तिला संजयबरोबर फोटो काढायचा नव्हता,” असं हनीफ म्हणाले होते.