Sanjay Dutt on Dating Madhuri Dixit : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची जोडी ९० च्या दशकात ‘साजन’, ‘थानेदार’ आणि ‘खलनायक’ या चित्रपटांमध्ये प्रचंड गाजली होती. पण, त्यांच्यातील कथित अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्यांनीही प्रचंड खळबळ उडवून दिली होती. १९९३ मध्ये जामिनावर बाहेर आल्यानंतर संजय दत्तने याबद्दल भाष्य केलं होतं. “माझं तिच्यासोबत अफेअर असतं तर बरं झालं असतं,” असं संजय दत्त म्हणाला होता. तसेच माधुरीची माफी मागितली होती, असंही त्याने सांगितलं होतं.

‘साजन’ चित्रपटाचं शूटिंग करताना माधुरी व संजय ते डेट करू लागले होते, पण १९९३ मध्ये संजय दत्तला अटक झाली, त्यानंतर कुटुंबियांमुळे माधुरी दीक्षित संजय दत्तपासून दूर गेली, असं म्हटलं जातं. ऑक्टोबर १९९३ मध्ये जामिनावर बाहेर आल्यानंतर संजय दत्तने ‘मूव्ही मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत या अफवांवर आणि माधुरीबरोबरच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली होती.

माधुरीने तुझ्याशी कोणतंही नातं असल्याची गोष्ट नाकारली आहे, त्यावर संजय म्हणालेला, “तिच्या वक्तव्याने मला काही फरक पडत नाही. मी तिचा सहकलाकार होतो आणि आम्ही अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. मला माझ्या सर्व सहकलाकारांशी चांगले संबंध ठेवावे लागतात, मग ती माधुरी असो वा श्रीदेवी. उदाहरणार्थ, ‘गुमराह’ चित्रपटाच्या पहिल्या काही दिवसांत मी तितका कम्फर्टेबल नव्हतो, कारण श्रीदेवीचा स्वभाव शांत आणि रिझर्व्ह आहे. त्यामुळे मला तिच्याशी बोलावं लागलं होतं, म्हणूनच माधुरीने जे काही म्हटलं, त्याने मला अजिबात फरक पडला नाही.”

संजय दत्तने मागितलेली माधुरी दीक्षितची माफी

अफेअरच्या बातम्या समोर आल्यानंतर आपण स्वतः माधुरीची माफी मागितली होती, असं संजय दत्तने सांगितलं होतं. “साजनच्या काळात ही बातमी पसरली होती. वृत्तपत्रांमध्ये ही बातमी आली तेव्हा ती केनियामध्ये ‘खेल’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. त्यानंतर जेव्हा ‘साजन’चे शूटिंग सुरू झाल्यावर मी तिच्याकडे गेलो आणि तिची माफी मागितली. कारण कोणतीही चूक नसताना तिला लोकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागत होतं,” असं संजय दत्तने सांगितलं होतं.

माझं माधुरीबरोबर अफेअर असतं तर बरं झालं असतं – संजय दत्त

तुम्ही खरंच एकमेकांना डेट करत होतात का? असा थेट प्रश्न विचारल्यावर संजयने मिश्किलपणे उत्तर दिलं होतं. “माझं माधुरीबरोबर अफेअर असतं तर बरं झालं असतं, पण तसं काही नव्हतं. मी माझ्या प्रत्येक सहकलाकाराशी मित्राप्रमाणे राहतो. तुम्ही मला रवीना टंडनबरोबर पाहिलं तर तुम्हाला वाटेल की माझं तिच्याबरोबरही अफेअर आहे,” असं संजयने म्हटलं होतं. तसेच लग्नाच्या अफवांवर “माझं तिच्याशी लग्न होण्यासाठी आधी आमच्यात काहीतरी असायला हवं ना,” असं संजय दत्त म्हणाला होता.