Sanjay Dutt on Sunil Dutt’s tough choice as Nargis lay in coma: संजय दत्त सध्या विविध सिनेमांतून आणि भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तो नुकताच ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अभिनेता त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. पण, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी बोलताना दिसतो. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आई नर्गिस यांच्या निधनाचा अत्यंत वेदनादायी काळ सांगितला. त्याचा पहिला सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच आईचे निधन झाल्याची भावनिक आठवण त्याने सांगितली.
AIG Hospitalsच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्त म्हणाला, “माझ्या आईचे स्वादुपिंडाच्या (पॅनक्रियाटिक) कर्करोगामुळे निधन झालं. तो १९८० च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ होता. आज जसे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तसे त्या काळात नव्हते. आम्ही आईला उपचारांसाठी न्यूयॉर्कला घेऊन गेलो होतो, तिथे तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.”
“मी तेव्हा फक्त १९-२० …”
तो पुढे म्हणाला, “मी तेव्हा फक्त १९-२० वर्षांचा होतो. आईला त्या अवस्थेत पाहणे खूप कठीण होते. आम्ही प्लेटलेट्स दान केल्या, शक्य ते सर्व प्रयत्न केले. माझ्या बहिणी माझ्यापेक्षा लहान होत्या. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी तो अत्यंत वेदनादायी काळ होता.”
संजय दत्त पुढे असेही म्हणाला, “आईवर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू होते, त्याचदरम्यान माझा पहिला सिनेमा रॉकी प्रदर्शित होणार होता. आई कोमात असताना माझ्या वडिलांनी मला चित्रपट पूर्ण करण्यासाठी भारतात पाठवले. त्या वेळी मला त्यांचा निर्णय अजिबात समजला नव्हता. आई कोमात असताना चित्रपट महत्त्वाचा कसा असू शकतो, असा प्रश्न मला पडला होता. पण, मी त्यांचे ऐकले आणि काम पूर्ण करून न्यूयॉर्कला गेलो.”
आईच्या शेवटच्या दिवसांची आठवण सांगताना संजय दत्त म्हणाला, “मी तिला शेवटपर्यंत संघर्ष करताना पाहिलं. तिला फक्त एकदा घरी परत यायचे होते, असं मला वाटत होते. ती घरी परतली आणि त्यानंतर तिने जगण्यासाठीचा संघर्ष थांबवला, त्यानंतर तिचे निधन झाले.”
याच मुलाखतीत संजयने वडील सुनील दत्त यांच्याबद्दलही भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “माझे वडील कडक स्वभावाचे होते, पण आज आमच्यात जी मूल्ये आहेत, ती त्यांच्याकडूनच मिळाली आहेत. मोठ्यांचा आदर करणे, डॉक्टरांचा सन्मान करणं त्यांनीच शिकवलं. डॉक्टर माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी ते माझे डॉक्टर आहेत, म्हणून मी त्यांचा नेहमी आदर करतो,” असं तो म्हणाला.
१९८१ मध्ये नर्गिस यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ५१ इतके होते. त्यांच्या निधनानंतर काही दिवसांतच संजय दत्तचा पहिला चित्रपट ‘रॉकी’ प्रदर्शित झाला; तर २००५ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने सुनील दत्त यांचे निधन झाले, त्यावेळी त्यांचे वय ७५ होते.
