विक्रम चंदीरामानी

संजय दत्त सध्या राजा या शिवाजी सिनेमामुळे चर्चेत आहेत. तसेच, विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही महिन्यांत ते राजकारणात पुनर्पण करू शकतात. त्यांच्या जन्मपत्रिकेनुसार जूनपासूनच तसे काही प्राथमिक संकेत दिसू शकतात. २९ जुलैला त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या आसपास किंवा त्यानंतर काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ हे महिने त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीबरोबरच संभाव्य राजकीय पुनर्प्रवेशाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. हा काळ २०२७ पर्यंत प्रभावी राहण्याची शक्यता असून, या काळात हा अभिनेता चित्रपटसृष्टी आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत आपले स्थान अधिक मजबूत करू शकतो.

यापूर्वी संजय दत्त यांनी राजकीय प्रवेश केला होता; पण राजकारणातील त्यांची ती कारकीर्द अल्पकाळ होती. मात्र, हा टप्पा पूर्णपणे वेगळा असू शकतो. त्या वेळी परिस्थितीमुळे त्यांचा राजकीय प्रवास आकार घेऊ शकला नव्हता. मात्र, या वेळी ग्रहस्थिती अधिक अनुकूल दिसत असून, हा प्रवेश दबावामुळे नव्हे, तर ताकदीच्या भूमिकेतून होण्याची शक्यता आहे.

संजय दत्त यांचे नाव पुन्हा एकदा राजकीय चर्चेत पुढे येत आहे; पण आजची परिस्थिती वेगळी आहे. सिनेमा आणि राजकारण यांच्यातील संबंध अधिक ठळक होताना दिसत आहेत. तमिळनाडूमध्ये विजय यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे चित्रपट कलाकार सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचू शकतात हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे संजय दत्त यांच्याकडे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक आहे.

संजय दत्त चित्रपट व राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे वडील सुनील दत्त हे लोकप्रिय अभिनेते, तसेच काँग्रेसचे नेते व केंद्रीय मंत्री होते. नर्गिस या राज्यसभा सदस्य होत्या; तर बहीण प्रिया दत्त यांनी यांनीही खासदार म्हणून काम केले आहे. त्यामुळे संजय दत्त राजकारणात सक्रिय नसले तरी राजकारण हे त्यांच्या आयुष्याचा नेहमीच एक भाग राहिले आहे.

२००९ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश करून लखनऊ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. या मतदारसंघाचे पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रतिनिधित्व केले होते. मात्र, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना निवडणूक लढवण्यास मनाई केली आणि त्यांचा हा राजकीय प्रयत्न अपूर्ण राहिला. काही काळ त्यांनी पक्षाचे महासचिव म्हणून काम केले; पण २०१० च्या सुरुवातीला त्यांनी राजकारणातून माघार घेत, पुन्हा चित्रपटांवर लक्ष केंद्रित केले.

सध्या संजय दत्त हे शनी महादशा आणि चंद्रभुक्तीतून जात आहेत. २०१४ पासून त्यांच्या आयुष्यावर शनीचा प्रभाव असून, त्यांच्यासाठी हा काळ कठोर परिश्रम, संघर्ष आणि परीक्षांचा राहिला आहे. त्यांनी फुप्फुसाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी सामना करून, त्यावर मात केली आणि पुन्हा चित्रपटसृष्टीनत पुनरागमन केले. त्यानंतर त्यांनी स्वतःची प्रतिमा नव्याने घडवली आणि अनेक चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या.

गेल्या काही वर्षांत त्यांचा प्रवास मुख्यतः चित्रपटसृष्टीपुरताच मर्यादित राहिला. त्यांनी त्यांची सार्वजनिक प्रतिमा हळूहळू पुन्हा उभी केली. अनेकांना वाटत होते की, राजकारणाचा अध्याय त्यांच्या आयुष्यात कायमचा बंद झाला आहे; पण करिअर नेहमी सरळ रेषेत पुढे जात नाही.

जन्मपत्रिकेनुसार येणारा काळ त्यांच्या आयुष्यात राजकारणाचा अध्याय पुन्हा उघडू शकतो आणि यावेळी परिस्थिती अधिक अनुकूल दिसते. हा काळ त्यांना दृश्यमानता, हालचाल आणि अधिक स्थिर राजकीय भूमिका मिळवून देऊ शकतो.

त्यांच्या सध्याच्या व्यावसायिक निवडींमध्येही या बदलाचे संकेत दिसून येतात. त्यांचा आगामी चित्रपट आखिरी सवाल सेन्सॉरशी संबंधित विलंब आणि त्यातील स्पष्ट राजकीय आशयामुळे आधीच चर्चेत आहे. काही प्रमाणात हा चित्रपट त्यांच्या पुढील आयुष्यातील दिशेचा संकेत देत असल्याचेही जाणवते.

जर हे संकेत आणि कालरेषा प्रत्यक्षात उतरल्या, तर पुढील काही महिन्यांत संजय दत्त राजकारणाकडे ठोस पावले टाकताना दिसू शकतात आणि या वर्षाच्या उत्तरार्धात या संदर्भात अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.