Pooja Bhatt on Sanjay Dutt and Mahesh Bhatt: महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट गाजले. त्यांच्या चित्रपटांतून अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. त्यांची मुलगी पूजा भट्ट हिने अभिनेत्री म्हणून महेश भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. तिने निर्माती व दिग्दर्शक म्हणूनही काम केले. मात्र, आजपर्यंत पूजा ‘सडक’, ‘दिल हैं कि मानता नहीं’, ‘जख्म’, अशा चित्रपटांसाठी ओळखली जाते.

१९९१ ला प्रदर्शित झालेला ‘सडक’ हा सिनेमा तिच्या कारकि‍र्दीच्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक होता. महेश भट्ट यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तर, संजय दत्त या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसला होता.

“जर तू तिला किस करू शकत नसशील, तर…”

या सिनेमात एका सीनमध्ये पूजा व संजय यांना एकमेकांना किस करायचे होते. मात्र, त्या सीनवेळी संजय दत्तने नकार दिल्याचे अभिनेत्रीने नुकताच खुलासा केला.

‘द पूजा भट्ट शो’ या पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने ही आठवण सांगितली. ती म्हणाली, “माझे वडील मला नेहमी सांगायचे की एखाद्या कृतीमागे तुमचा दृष्टीकोण काय असतो, हे महत्वाचे आहे. सडक चित्रपटाच्या एका सीनमध्ये मला व संजय दत्तला एकमेकांना किस करायचे होते. पण, संजय दत्तने तसे करण्यास नकार दिला. तो म्हणाला की मी तिला लहानपणापासून पाहिले आहे. मी तिला किस करू शकत नाही.”

पुढे पूजा भट्ट म्हणाली, “जेव्हा माझ्या वडिलांनी संजय दत्तचे म्हणणे ऐकले तेव्हा ते त्याला ढोंगी म्हणाले. ते त्याला म्हणाले की हे पूर्णपणे ढोंग आहे. जर तू तिला किस करू शकत नसशील, तर मग दुसऱ्या कोणाच्याही मुलीला किस करण्याचाही तुला काही अधिकार नाही.”

पूजा भट्ट आणि महेश भट्ट यांनी १९९० च्या दशकात डॅडी, दिल है कि मानता नहीं, नाराज, जख्म, तडीपार अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. १९९मध्ये प्रदर्शित झालेल्या कारतूस या चित्रपटानंतर महेश भट्ट यांनी दिग्दर्शन करणे बंद केले. त्यानंतर त्यांनी विशेष फिल्म्स (Vishesh Films)मध्ये सल्लागाराची भूमिका साकारली.

२०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांनी सडक २ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यामध्ये संजय दत्त, आदित्य रॉय कपूर व आलिया भट्ट हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसले होते. पूजा भट्टने या चित्रपटात कॅमिओ केला होता. त्यावेळी महेश भट्ट म्हणाले होते की त्यांनी आलियासाठी एकच चित्रपट केला. या चित्रपटावर टीका झाली होती.