Sanjay Dutt Dhurandhar 2 Role As Chaudhry Aslam Creating Buzz : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र, केवळ कमाईमुळेच नाही, तर या चित्रपटातील पात्रांमुळेसुद्धा हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील पात्रांचे खऱ्या आयुष्यातील काही व्यक्तींशी साधर्म्य आढळते.
आदित्य धरच्या या स्पाय थ्रिलरमध्ये संजय दत्तनं पाकिस्तानी पोलीस अधिकारी चौधरी अस्लम यांची भूमिका साकारली आहे. आता चौधरी अस्लम यांच्या पत्नी नौरिन अस्लम यांनी संजय दत्तच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. नौरिन यांनी सांगितलं की त्यांनी हा चित्रपट फक्त काही क्लिप्समधूनच पाहिला आहे. यासहस त्यांनी चित्रपटात असलेल्या शिव्यांबद्दलही मत व्यक्त केलं.
चौधरी अस्लम यांच्या पत्नी संजय दत्तबद्दल काय म्हणाल्या?
‘आजतक रेडिओ’च्या पॉडकास्टमध्ये बोलताना नौरिन यांनी सांगितलं की संजय दत्त या भूमिकेसाठी योग्य निवड आहे. नौरिन अस्लम पुढे चित्रपटातील त्यांना आवडलेल्या सीनबद्दल म्हणाल्या, “तो(संजय दत्त) कारजवळ उभा राहून वर पाहतो, त्या क्षणी मला अस्लमच आहे असं वाटलं.” नौरिन यांनी संजय दत्तच्या भूमिकेचं कौतुक जरी केलं असलं तरी त्यांनी थोडी नाराजीही व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, निर्मात्यांनी त्यांच्याशी, पोलिसांशी किंवा पत्रकारांशी बोलून अस्लम यांचं व्यक्तिमत्त्व अजून चांगल्या पद्धतीने दाखवायला हवं होतं. पतीबद्दल त्या म्हणाल्या, “त्यांनी अशी कामं केली होती जी इतर पोलिसांना जमली नव्हती.”
‘धुरंधर’मुळे पाकिस्तानी राजकारणी नबील गबोल यांचंही नाव चर्चेत आलं आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या माध्यमाच्या वृत्तानुसार नबील गबोल यांनी ते ‘धुरंधर’चा तिसरा भाग काढणार आणि त्यातून ल्यारीचं सत्य सांगणार असं एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी हे पात्र त्यांच्यावरच आधारित असल्याचाही दावा केलेला. पण, नंतर त्यांनी चक्क राकेश बेदी यांचं एका मुलाखतीत कौतुकही केलं आहे. ज्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले. राकेश बेदींबद्दल नबील गबोल म्हणाले, “राकेश बेदींना माझा निरोप द्या. ते ज्येष्ठ कलाकार आहेत आणि मी त्यांचा आदर करतो. आय लव्ह यू”
दरम्यान, ‘धुरंधर’ने दाक्षिणात्य दिग्दर्शक राजमौली यांच्या ‘बाहुबली’ आणि अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा बॉक्स ऑफिसवरचा रेकॉर्डही मोडला आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटानं भारतातच तब्बल १,१०० कोटी रुपयांची कमाई केली असून, फक्त १५ दिवसांत जगभरातील कमाई १,३०० कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.
