Sanjay Dutt Talks About Shiv Puran & Bhagavad Gita : संजय दत्त बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘धुरंधर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. संजय दत्त व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अभिनेता अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही अडकला आहे. त्याने तो जेलमध्ये असताना शिवपुराण आणि इतर धार्मिक ग्रंथ वाचायचा, असं म्हटलं आहे.
संजय दत्त १९९३ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दोषी ठरल्यानंतर तो ४२ महिने पुण्यातील येरवडा तुरुंगात होता. शिक्षा म्हणून संजय दत्त जवळपास दोन वर्षे तुरुंगात होता. ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तने तो तुरुंगात असताना धार्मिक ग्रंथ वाचायचा, अशी माहिती दिली आहे.
मी पंडित आहे – संजय दत्त
संजय दत्तला मुलाखतीत तुम्ही भगवद् गीता, महाभारत व कुराण हे सगळं वाचलं आहे, असं ऐकलं ते खरं आहे का? असं विचारल्यानंतर तो म्हणालेला, “फक्त एवढंच नाही तर शिव पुराण, गणेश पुराण आणि सगळंच वाचलं आहे.” पुढे त्याला तुरुंगात या गोष्टी उपलब्ध असतात का, असं विचारल्यानंतर तो म्हणालेले, “मी मागवलं होतं आणि मी पंडित आहे, जे एआयला माहीत नाहीये. मी यजुर्वेद, ऋग्वेद हेही वाचलं आहे.”
संजय दत्तला पुढे त्याला कोणत्या गोष्टीचा राग येतो आणि कोणालाही तुला आनंदी पाहायचं असेल तर काय केल्यान तू आनंदी होतो, असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “मला कोणी खोटं बोलल्यानंतर, कोणी अनादर केल्यानंतर राग येतो; परंतु कोणी फक्त नीट बोललं, माझ्यावर प्रेम केलं तरी मला खूप आनंद मिळतो. आता तर माझा राग खूप कमी झाला आहे. आधी तर ९०च्या काळात खूपच राग यायचा.”
दरम्यान, संजय दत्त सध्या आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यामध्ये त्यानं अस्लम चौधरी ही भूमिका साकारली आहे. त्यानं त्याच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
