Sanjay Dutt Clarification : बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचे एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे. ‘शेखर टुनाइट’ या कार्यक्रमात “मला आता भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही,” असं वक्तव्य संजय दत्तने केलं होतं. त्याच्या या विधानावरून चांगलाच गदारोळ झाला. त्यानंतर आता खुद्द संजय दत्तने यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. “मी जे काही बोललो ते पूर्णपणे स्क्रिप्टेड होतं आणि त्याचा उद्देश केवळ हलका-फुलका विनोद करणं हाच होता. माझ्या शब्दांचा वेगळाच अर्थ काढला गेला,” असं त्याने म्हटलंय.

काय म्हणाला होता संजय दत्त?

“आपल्या देशातील नागरिक अत्यंत प्रेमळ असून इथे कायम शांतता असायला हवी, मात्र मला आता भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही. भारतीय लोक मोठ्या मनाचे आणि आदरातिथ्य करणारे आहेत. आपण जगाला भरभरून दिलं आहे आणि आपण तसेच राहिलं पाहिजे. ते शांततेचे जुने दिवस पुन्हा लवकर परतावेत, अशी मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो,” असं संजय दत्त म्हणाला होता. पण आता त्याने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

कोणाचाही अपमान, अनादर करण्याचा हेतू नव्हता- संजय दत्त

“मला हे स्पष्ट करायचंय की, कोणत्याही व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा संस्थेच्या भावना दुखावण्याचा, त्यांचा अपमान किंवा अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता. मी जे बोललो ते स्क्रिप्टेड होतं. त्याचा उद्देश केवळ हलका-फुलका विनोद करणं हा होता. त्यामागील भावना ‘मुन्ना भाई’सारख्या चित्रपटाप्रमाणे विनोदी होत्या. ते उपरोधात्मक होतं. खासकरून ‘गांधीगिरी’ची संकल्पना- ज्याचा उद्देश प्रेम, आपुलकी, एकोपा आणि सलोख्याचा संदेश देणं हा होता. दुर्दैवाने, माझ्या शब्दांचा वेगळाच अर्थ काढला गेला आणि त्याचा मूळ संदर्भ बदलला,” असं संजय दत्त म्हणाला.

sanjay-dutt-shekhar-tonight-statement-clarification
संजय दत्तची पोस्ट (सौजन्य – एक्स)

पंतप्रधान मोंदीचा विदेश दौरा ते ट्रम्प यांनाही मार्मिक टोला

संजय दत्तने एका काल्पनिक पंतप्रधानाचे भाषण सादर करताना पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर आणि ट्रम्प यांच्या धोरणांवर टोला लगावला. तो म्हणाला की, जनतेशी संपर्क ठेवण्यासाठी मी देशातच राहीन. तसेच स्वतःचे फोटो काढून त्याऐवजी देश आणि गांधीजींचे विचार महत्त्वाचे मानून त्यांचे फोटो लावेन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘ट्रम्प मामू’ असा उल्लेख करत ते जगातील शांतता बिघडवत असल्याचं तो म्हणाला. त्यांनी आक्रमकता सोडून विनम्रता आणि ‘गांधीगिरी’ शिकायला हवी असे तो म्हणाला. ट्रम्प यांनी सारखे ‘टॅरिफ’ लावण्याऐवजी लोकांची ‘तारीफ’ (कौतुक) करायला शिकावी, असं म्हणत संजय दत्तने त्यांना ‘जादूची झप्पी’ देण्याचं वक्तव्य करून भाषणाचा शेवट केला.