Sanjay Gupta on Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक सिनेमांत एकापेक्षा एक भूमिका साकारल्या. १९७० आणि ८० च्या दशकात त्यांची बॉलीवूडचा अँग्री यंग मॅन अशी ओळख निर्माण झाली होती. त्यांना चढ-उताराचादेखील सामना करावा लागला. अमिताभ बच्चन आजही विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. कौन बनेगा करोडपती या शोचे ते वर्षानुवर्षे सूत्रसंचालन करत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलेले अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, कोरिओग्राफर त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात. अनेक किस्सेही सांगतात. आता बॉलीवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बिग बींबद्दल वक्तव्य केले आहे. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या काँटे या सिनेमांत त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

“अमितजी म्हणालेले की…”

संजय गुप्ता यांनी हुसैन झैदी यांच्याबरोबर संवाद साधला. ते म्हणाले की काँटे सिनेमात काम करताना अमिताभ बच्चन यांनी एक अट ठेवली होती. ती म्हणजे त्यांचे पात्र किंवा इतर पात्र त्यांना शिवीगाळ करणार नाही. कारण- स्क्रीप्टमध्ये शिवीगाळ लिहिली होती.

संजय गु्प्ता म्हणाले, “स्क्रिप्टमध्ये शिवीगाळ असलेले संवाद लिहिले होते. मात्र, नंतर आम्ही ते वापरले नाहीत. अमितजी म्हणालेले की कोणीही मला शिवीगाळ करणार नाही. त्यावर मी त्यांना म्हणालो की ठीक आहे. पण याचा अर्थ इतर पात्रं एकमेकांना शिव्या देणार नाहीत, असा नाही. त्यानंतर सेन्सॉरच्या प्रक्रियेदरम्यानही आम्ही त्या सीनमध्ये काही बदल केले होते.”

याआधी स्क्रीनशी संवाद साधतानाही संजय गुप्तांनी अमिताभ बच्चन यांचा हा किस्सा सांगितला होता. ते म्हणालेले, “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांनी मला बाजूला घेतले आणि सांगितले की मी शिवीगाळ करणार नाही. बिग बी म्हणालेले की संजय मी शिवीगाळ करणार नाही. मी ही एक गोष्ट कधीच केली नाही. जर इतर कोणी शिवीगाळ करत असेल तर मला काहीच अडचण नाही.”

सायरस बरूचाला दिलेल्या मुलाखतीत संजय गुप्ता यांनी अमिताभ बच्चन यांना सिनेमासाठी ऑफर दिली होती आणि जेव्हा त्यांना स्क्रीप्ट सांगायची होती, त्यावेळची आठवण सांगितली होती.ते म्हणालेले की अमिताभ बच्चन यांचे घर फोटोंनी भरलेले होते. ज्यावेळी मी त्यांना स्क्रीप्ट ऐकवत होतो, त्यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. माझे बोलणे संपल्यानंतरही ते शांत बसले होते. मी त्यांना स्क्रीप्ट कशी वाटली, असे विचारले. त्यावेळी त्यांनी गोष्ट आवडल्याचे सांगितले. त्यामुळे मला थोडे बरे वाटले.

‘काँटे’ या सिनेमाबद्दल बोलायचे तर, २००२मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच, संजय दत्त, सुनील शेट्टी, लकी अली, महेश मांजरेकर आणि कुमार गौरव असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते.