संजय खान आणि झीनत अमान हे बॉलीवूडमधील एकेकाळी अनेकांच्या चर्चेचा विषय होते. त्यांच्या कथित प्रेमसंबंधांबरोबरच संजय खान यांच्यावर झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपांचीही अनेक वर्षे चर्चा झाली. आता प्रथमच संजय खान यांची मुलगी फराह खान अली यांनी या प्रकरणावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

एका मुलाखतीत त्यांनी मान्य केलं की, वडिलांचे झीनत अमान यांच्याबरोबरच्या नात्यामुळे त्यांच्या आई झरीन कतराक खान आणि वडिलांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र, संजय खान यांनी झीनत अमान यांच्यावर कधीही शारीरिक हल्ला केला नव्हता, असं सांगत त्यांनी त्या आरोपांचे ठामपणे खंडन केलं. विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत फराह खान अली म्हणाल्या की, हे प्रकरण घडलं तेव्हा त्या अवघ्या ९-१० वर्षांच्या होत्या. त्यामुळे त्या काळातील घटनांची त्यांना फारशी माहिती नाही. तरीही, संजय खान यांनी झीनत अमान यांच्यावर हात उगारला होता, या अनेक वर्षांपासून केल्या जाणाऱ्या दाव्यांना त्यांनी फेटाळून लावलं. हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

फराह खान अली यांनी वडील संजय खान आणि झीनत अमान यांच्या नात्यामुळे त्यांच्या आई-वडिलांच्या संसारावर झालेल्या परिणामाबद्दलही मोकळेपणाने भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, तो त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी काळ होता आणि त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांचे नाते जवळपास तुटण्याच्या स्थितीत आले होते. या प्रसंगाची आठवण सांगताना त्यांनी आई झरीन कतराक खान यांच्या खंबीरपणाचं विशेष कौतुक केलं. फराह म्हणाल्या की, धाकटा भाऊ झायेद खान याच्या जन्मानंतर काही दिवसांतच त्यांच्या आईने घर सोडलं आणि तब्बल तीन महिने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. त्या काळात झायेदसह संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी संजय खान यांनी सांभाळली.

फराह यांच्या मते, तीन महिन्यांनंतर झरीन घरी परतल्या तेव्हा संजय खान यांनी त्यांच्यात झालेला मोठा बदल पाहिला. त्या अधिक आत्मविश्वासू, स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर ठामपणे उभ्या राहू शकणाऱ्या महिला बनल्या होत्या. फराह यांनी सांगितलं की, हाच त्यांच्या आई-वडिलांच्या नात्यातील निर्णायक टप्पा ठरला आणि त्यानंतर संजय खान पुन्हा आपल्या कुटुंबाकडे वळले. फराह खान अली यांनी या कठीण काळात त्यांच्या आई झरीन कतराक खान यांनी परिस्थिती कशी हाताळली, याबद्दलही सांगितलं. त्या म्हणाल्या की, आईने कधीही कटुता मनात ठेवली नाही किंवा कोणावरही सार्वजनिकपणे आरोप केले नाहीत. उलट, संपूर्ण कठीण काळात तिने अत्यंत संयम, सन्मान आणि शांततेने परिस्थितीचा सामना केला.

फराह खान अली यांनी त्यांच्या आईने झीनत अमान यांच्याशी वाद घातला, या अफवाही फेटाळून लावल्या. त्या म्हणाल्या की, तो त्यांच्या आईचा स्वभावच नव्हता. आई झरीन कतराक खान यांचे वर्णन करताना फराह म्हणाल्या, “माझी आई दुसऱ्या कोणत्या महिलेशी भांडेल किंवा तिला मारहाण करेल, असं तुम्हाला खरंच वाटते का? अजिबात नाही. माझी आई अत्यंत सुसंस्कृत, संयमी व्यक्ती आहे. त्यामुळे या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत.”

फराह खान अली यांनी संजय खान आणि झीनत अमान यांनी लग्न केलं होतं, असंही सांगितलं. त्या म्हणाल्या की, दोघांनी मुस्लीम धर्मानुसार निकाह केला होता आणि नंतर त्याच पद्धतीने त्यांचा घटस्फोटही झाला. मात्र, धार्मिक विधी आणि नियमांबाबत सविस्तर माहिती देण्याच्या बाबतीत त्या योग्य व्यक्ती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. “मी परंपरावादी मुस्लिम नाहीये, त्यामुळे रितीरिवाज आणि नियम मला पूर्णपणे माहिती नाहीत,” असे त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “आईने या विषयावर आमच्याशी बोलताना एवढेच सांगितले होते की, “तुझ्या वडिलांना तिच्याबद्दल आकर्षण वाटत होतं, त्यामुळे मी फक्त तिलाच दोष देऊ शकत नाही. दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण होतं. कदाचित त्या काळात त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी असतील. पण माझ्या आईने जे सांगितलं, त्यावर माझा विश्वास आहे की, माझ्या वडिलांनी झीनत अमान यांच्यावर कधीही हात उचलला नव्हता.”