Sanjay Leela Bhansali Health News: संजय लीला भन्साळी यांचा २४ फेब्रुवारी ६३ वा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानंतर लगेचच ते रुग्णालयात दाखल असल्याची धक्कादायक बातमी आली. भन्साळी यांना हृदयविकाराचा झटका आला असून आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, अशी बातमी आली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी करून सत्य सांगितलं आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय, कलात्मक दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळी ओळखले जाते. ते चित्रपटांतील भव्य सेट्स, शास्त्रीय संगीत आणि भावूक कथांसाठी ओळखले जाते. सध्या संजय लीला भन्साळी सध्या रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यग्र आहेत. अशातच त्यांच्या प्रकृतीबद्दल धक्कादायक बातमी आली. याबद्दल त्यांच्या कुटुंबाने काय म्हटलं, ते जाणून घेऊयात.

“संजय लीला भन्साळी यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. ते नियमित वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही,” अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली आहे.

“सर्वांनी दाखवलेलं प्रेम आणि काळजीबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार.” भन्साळी प्रॉडक्शनच्या अकाउंटवरून इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हे निवेदन देण्यात आलं आहे.

संजय लीला भन्साळी यांचे करिअर

संजय लीला भन्साळी हे उत्तम दिग्दर्शक, प्रोड्युसर, स्क्रीनरायटर व संगीतकार आहेत. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१५ मध्ये त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. त्यांनी १९९६ मध्ये खामोशी चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं.

१९९९ मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ आणि २००२ मध्ये ‘देवदास’ या चित्रपटासाठी त्यांनी कौतुक मिळवलं. २००५ मध्ये ‘ब्लॅक’ दिग्दर्शित करण्यासाठी त्यांना हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. २००७ मध्ये ‘सांवरिया’ आणि २०१० मध्ये ‘गुजारिश’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ‘गुजारिश’ या चित्रपटाचे ते संगीतकारही होते.

त्यांनी २०१३ मध्ये गोलियों की रासलीला राम-लीला, २०१५ मध्ये बाजीराव मस्तानी, २०१८ मध्ये पद्मावत आणि २०२२ मध्ये गंगूबाई काठियावाडी हे चित्रपट दिग्दर्शित केले. २०२४ मध्ये, भन्साळी यांनी भन्साळी म्युझिक नावाचे त्यांचे संगीत लेबल अनावरण केले. हीरामंडी ही वेब सीरिज दिग्दर्शित करून त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केले.

संजय लीला भन्साळी यांनी सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘दो दिवाने सहर में’ या सिनेमाची सहनिर्मिती केली आहे. या चित्रपटात इला अरुण, जॉय सेनगुप्ता, आयशा रझा, विराज गेहलानी, संदीपा धर आणि नवीन कौशिक यांच्याही भूमिका आहेत. रवी उदयवार दिग्दर्शित हा चित्रपट झी स्टुडिओज आणि संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी प्रॉडक्शनने प्रस्तुत केला आहे.