Sanjay Leela Bhansali Love and War Release Date Announce : आपल्या बिग बजेट सिनेमांमुळे ओळखले जाणारे बॉलीवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी. ‘हीरामंडी’च्या यशानंतर आता भन्साळी त्यांचा पुढचा नवीन चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ घेऊन येत आहेत, याची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अशातच आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाबाबत गेल्या काही काळापासून सतत नवनवीन अपडेट्स येत होते. अनेकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली गेली. पण आता निर्मात्यांनीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे.

रणबीर, आलिया आणि विक्की पहिल्यांदाच एकत्र

संजय लीला भन्साळींच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल हे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या तिघांना चित्रपटात एकत्र पाहणे, ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. ‘लव्ह अँड वॉर’ हा एक रोमँटिक ड्रामा असलेला चित्रपट आहे. तिघांच्या दमदार अभिनयाबरोबरच संजय लीला भन्साळींच्या दिग्दर्शनातली भव्यताही यातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘लव्ह अँड वॉर’ची अधिकृत घोषणा जानेवारी २०२४ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र पुन्हा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. स्वत: रणबीरनेही इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये या विलंबाला दुजोरा दिला होता. ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘रामायण भाग १’ या चित्रपटानंतरच ‘लव्ह अँड वॉर’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असे त्याने स्पष्ट केले होते.

जानेवारी २०२७मध्ये रिलीज होणार ‘लव्ह अँड वॉर’

संजय लीला भन्साळींचा ‘लव्ह अँड वॉर’ हा बहुचर्चित चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच, २१ जानेवारी, २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. याबद्दलची माहिती ‘संजय लीला भन्साळी प्रॉडक्शनकडून दिली गेली आहे. दरम्यान, या पोस्टखाली अनेक चाहत्यांनी चित्रपटासाठी उत्सुक असल्याच्या अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट संजय लीला भन्साळींच्या आतापर्यंतच्या सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक भव्य प्रेमगाथा म्हणून ‘लव्ह अँड वॉर’कडे पाहिले जात आहे.

दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या इतर प्रोजेक्ट्सप्रमाणे या चित्रपटातही संजय लीला भन्साळींचे भव्य सेट्स, जबरदस्त संगीत आणि सुंदर सादरीकरण पाहायला मिळेल. हा चित्रपट केवळ हिंदीतच नव्हे, तर तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे.