संजय लीला भन्साळी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी आणि अनेक हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. मात्र, त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एका फ्लॉप चित्रपटाने झाली होती १९९६ मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा पहिला चित्रपट ‘खामोशी’ला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाल नव्हता.

मात्र, या अपयशामुळे खचून न जाता संजय लीला भन्साळींनी त्यांच्या मनातील राग आणि जिद्द यांचं रूपांतर कामात केलं आणि त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट बनवला. या चित्रपटामुळे ऐश्वर्या रायला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक आश्वासक अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळख मिळाली. आज ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट अनेकांच्या मते सर्वोत्कृष्ट मानला जातो. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर त्यावरही टीका झालेली. विशेषतः ऐश्वर्या रायवर चित्रित करण्यात आलेल्या ‘निंबूडा’ या गाण्यावर काही जणांनी टीका करत, “ऐश्वर्याकडून मुजरा करून घेतला,” अशा शब्दांत संजय लीला भन्साळी यांची खिल्ली उडवली होती.

संजय लीला भन्साळींनी व्यक्त केलेला राग

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार १९९९ मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील कामाच्या पद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, “वितरक, निर्माते, कलाकार आणि प्रेक्षकांकडून येणारा एवढा दबाव पाहून स्टीव्हन स्पिलबर्गसारखा दिग्दर्शकही पळ काढेल.” याच मुलाखतीत त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटानंतर त्यांना सहन करावी लागलेल्या टीकेचाही उल्लेख केला. ‘निंबूडा’ गाण्यावर प्रतिक्रिया देताना काही समीक्षकांनी, “ऐश्वर्या रायकडून मुजरा करून घेतलाय,” अशा शब्दांत चित्रपटावर आणि भन्साळी यांच्या दिग्दर्शनावर टीका केल्याचं त्यांनी सांगितलं.

हम दिल दे चुके सनमसाठी संजय लीला भन्साळींनी घेतलेली प्रचंड मेहनत

संजय लीला भन्साळी म्हणाले की, या चित्रपटातील प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीबाबत ते इतके काटेकोर होते की, ते दिवसाचे २४ तास काम करायचे. “माझ्या अंगात जणू वेड संचारलं होतं. आतून मी जिद्दीने पेटलेलो होतो आणि माझ्यात प्रचंड ऊर्जा होती,” असं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, “माझ्यामुळे संपूर्ण युनिट अक्षरशः वेडं झालं होतं.” आजही संजय लीला भन्साळी हे सेटवर अत्यंत शिस्तप्रिय, कामात कोणतीही तडजोड न करणारे आणि गरज पडल्यास रागावणारे दिग्दर्शक असल्याचं अनेक कलाकार सांगत असतात. संजय लीला भन्साळी यांनी सांगितलं की, चित्रपटातील प्रत्येक लूक आणि दागिन्यांची निवड त्यांनी स्वतः केली होती. ते म्हणालेले, “गरबा डान्ससाठी कलाकारांचे कपडे खरेदी करण्यासाठी मी स्वतः भुलेश्वरला गेलो होतो. स्मिता जयकर यांच्या अगदी छोट्या दागिन्यांचीही काळजीपूर्वक निवड केली होती. पडद्यांचा रंग, सोफ्याचं कापड अशा सेटवरील प्रत्येक गोष्टीकडे मी बारकाईने लक्ष दिलं. अगदी ऐश्वर्या रायच्या डोळ्यांतील काजळ किती जाड असावं, हेही मी ठरवलं होतं.”

‘खामोशी’ चित्रपटाच्या अपयशामुळे झोप उडाली होती असंही संजय लीला भन्साळी यांनी सांगितलेलं. ते म्हणालेले, “सलग दोन महिने मी खूप रागात होतो, कारण माझा चित्रपट सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही.” चित्रपटसृष्टीबद्दल बोलताना ते म्हणाले, “या इंडस्ट्रीत काही लोक इतरांच्या अपयशाचा आनंद साजरा करतात. मात्र, माझ्या त्या रागानेच मला पुढे जाण्याचा आत्मविश्वास दिला.” गेल्या काही वर्षांत ‘हम दिल दे चुके सनम’ नव्या पिढीने पुन्हा पाहिल्यानंतर चित्रपटातील महिला पात्रांचं चित्रण कसं करण्यात आलं आहे, यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. चित्रपटाच्या यशानंतर मुख्य अभिनेत्रीच्या पारंपरिक प्रतिमेबाबत विचारण्यात आलं असता, भन्साळी म्हणाले होते, “मला स्त्रियांनी स्त्रियांसारखं वागलेलं आवडतं.” त्यांनी पुढे असंही म्हटलं होतं, “मला महिलांचे छोटे केस आवडत नाहीत. अंबाड्याचं ओझं महत्त्वाचं असतं.”

याच मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या बालपणाबद्दलही भाष्य केलं. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्यामुळे लहानपणी अपमान सहन करावा लागल्याचं त्यांनी सांगितलं. स्वतःचं वर्णन “अस्वस्थ आणि संघर्षमय आयुष्य जगलेला” असं करत त्यांनी, “माझं बालपण अत्यंत वेदनादायी होतं,” असं म्हटलेलं. यापूर्वी सिमी गरेवाल’ला दिलेल्या मुलाखतीत कुटुंबातील परिस्थितीबद्दल त्यांनी खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, त्यांचे वडील दारूच्या आहारी गेले होते, त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली होती. ते पुढे म्हणाले, “घरात सतत आर्थिक अडचणी होत्या. लोक वारंवार घरी यायचे. लग्नसमारंभांसारख्या कार्यक्रमांमध्ये आमच्याकडे कमीपणाने पाहिलं जायचं, कारण माझे वडील अनेकदा नशेत असायचे.”