बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे शिस्तप्रिय आणि परफेक्शनिस्ट असल्याचं त्यांच्याबरोबर काम केलेले अनेक कलाकार सांगत असतात. अनेक कलाकारांनी यापूर्वी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल आणि प्रत्येक दृश्य त्यांच्या कल्पनेप्रमाणेच साकारण्याच्या आग्रहाबद्दल सांगितलं आहे. आता ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात काम केलेले ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर यांनी भन्साळींबरोबरचे अनुभव शेअर केले.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भन्साळी यांनी एकदा अभिनेते आदित्य पांचोली यांना सगळ्यांसमोर खडेबोल सुनावले होते आणि ते तापट स्वभावाचे आहेत असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी रणवीर सिंहबरोबरही काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत यतीन कार्येकर म्हणाले, “मी आणि रणवीर सिंह खूप चांगले मित्र झालो होतो. आमची छान गट्टी जमली होती. सेटवर आम्ही खूप धमाल करायचो. अर्थात, संजय सरांसमोर नाही. पण ते नसताना आम्ही खूप मजा-मस्ती करायचो. संजय लीला भन्साळी हे खूपच कडक स्वभावाचे आहेत. मात्र माझ्यासाठी दिग्दर्शक म्हणजे देवासमान असतो.”
सेटवर अभिनेत्यावर ओरडले होते संजय लीला भन्साळी
यतीन कार्येकर पुढे एक प्रसंग सांगताना म्हणाले, “एकदा मी संजय लीला भन्साळी यांना आदित्य पांचोली यांच्यावर सर्वांसमोर ओरडताना पाहिलं होतं. आदित्य एका ज्युनियर कलाकाराला रागावत होते, तेव्हा संजय सर मोठ्याने म्हणाले, आदित्य, गप्प बसा. ते पाहून मला धक्का बसला. त्यांच्या रागीट स्वभावाबद्दल मी यापूर्वीही अनेक गोष्टी ऐकल्या होत्या.”
हातातील गोष्टी फेकून मारायचे संजय लीला भन्साळी
ते पुढे म्हणाले, “एका अभिनेत्रीला एक स्टेप नीट जमत नव्हती, तेव्हा त्यांनी तिच्या दिशेने खुर्ची फेकल्याचंही मी ऐकलं आहे. त्यांनी अनेक मोबाईल आणि माईकही फोडले आहेत. त्यामुळे मी अशा गोष्टींसाठी आधीपासूनच मानसिक तयारी केली होती. मात्र आदित्य यांना याची अजिबात अपेक्षा नव्हती. ते पूर्णपणे हादरले होते.”
हे सर्व प्रसंग पाहूनही यतीन कार्येकर यांनी संजय लीला भन्साळी यांचं कौतुकच केलं. ते म्हणाले, “ते खूप हुशार आहेत. माझ्या मते हिंदी चित्रपटसृष्टीचे दोन मजबूत आधारस्तंभ म्हणजे संजय लीला भन्साळी आणि राजकुमार हिरानी. दोघांची काम करण्याची पद्धत मात्र पूर्णपणे वेगळी आहे.”
