Senior actor shares anecdote: ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा हे अनेकदा त्यांचे कुटुंब, मुले यांच्याबद्दल बोलतात. तसेच ते त्यांच्या वडिलांच्या आठवणीदेखील सांगतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या पत्नीबद्दल वक्तव्य केले आहे. मुलींना वाढवण्याचे आणि घर अगदी व्यवस्थित सांभाळल्याचे श्रेय त्यांनी पत्नीला दिले.

“त्या नशेतच माझ्या…”

शुंभकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत संजय मिश्रा म्हणाले, “ती माझ्या कुटुंबाची आणि माझ्या मुलांची काळजी घेते. ती उत्तराखंडमधील डीडीहाट या गावातील आहे. आमचं लग्न होण्याआधी मी या गावाचे नाव कधीही ऐकले नव्हते. लग्नानंतर सुरुवातीला काही तडजोडी कराव्या लागल्या. जेव्हा ती पहिल्यांदा मुंबईत आली तेव्हा अनेक गोष्टींचे तिला आश्चर्य वाटले होते, कलाकारांची दुनिया तिला वेगळी वाटली.”

याच मुलाखतीत त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची त्यांना खूप आठवण येत असे. संजय मिश्रा म्हणाले, “त्या दरम्यानच्या काळात माझे सासरे माझ्या घरी आले होते. मी माझ्या ड्रायव्हरबरोबर दारू प्यायलेलो होतो, त्या नशेतच माझ्या ड्रायव्हरला सांगितले की जिथे माझ्या वडिलांचे अत्यंसंस्कार झाले आहेत तिथे मला घेऊन चल.”

ते पुढे म्हणाले, “मी घाटावर गेलो, तिथे कोणत्या दुसऱ्या व्यक्तीची चिता जळत होती. मी त्या जळत्या चितेची राख माझ्या संपूर्ण शरीरावर घासली आणि माझ्या वडिलांना हाक मारू लागलो. जेव्हा मी घाटावर गेलो होतो, त्यावेळी मी खूप रडलो. मी खूप भावूक झालो होतो. माझी तशी अवस्था असतानादेखील लोक फोटोसाठी विचारत होते.”

“जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझ्या सासऱ्यांनी मला पाहिले, माझ्या संपूर्ण शरीरावर राख होती. ते त्यांच्या मुलीच्या भविष्याबाबत साशंक झाले. मी त्यांच्या पाया पडलो. माझा ड्रायव्हर आला आणि तो मला दुसऱ्या बाथरुममध्ये घेऊन गेला. त्याने मला अंघोळ करायला लावली. “

संजय मिश्रा असेही म्हणाले की, लहान असताना मी अभ्यास करत नसे, माझ्या वडिलांना माझी काळजी वाटत असे. ते मला म्हणत असत की, तू दहावी तरी पास हो, त्यानंतर तुला मी जिथे काम करतो तिथे वॉचमनची नोकरी लावून देईन.

अभिनेते असेही म्हणाले, “मी कधीच अभ्यासाची काळजी केली नाही. माझ्याकडून अभ्यास होत नसे. अभ्यास करणं हे माझ्या आयुष्याचं कधीच ध्येय नव्हतं. त्यावेळी जर त्यांनी मला सितारसारखे वाद्य घेऊन दिले असते तर मी गायक झालो असतो.”

पुढे ते असेही म्हणाले, “काही आठवड्यांपूर्वी मी टाइपरायटर आणला आहे. माझ्या वडिलांना वाटत होते की मी टाइपरायटिंग शिकावे, कारण टाइपरायटिंग करून मी दर महिन्याला ७०० रुपये कमवू शकतो, असे त्यांना वाटत होते. त्यावेळी मी त्यांचे ऐकले नव्हते, पण आता मी टाइपरायटिंग शिकत आहे.”