Sanjeev Kumar Unknown Facts: दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांनी अल्पावधीच बॉलीवूडमध्ये यश मिळवलं. ते ‘हरी भाई’ या नावाने ओळखले जायचे. त्यांनी ‘शोले’, ‘आंधी’, ‘त्रिशूल’, ‘कोशिश’ आणि ‘मौसम’ यांसारख्या चित्रपटांतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी प्रचंड संघर्ष केला. ज्येष्ठ चित्रपट पत्रकार हनीफ झवेरी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, करिअरच्या सुरुवातीला संजीव कुमार यांना अनेक ‘सी-ग्रेड’ चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या आणि कुटुंबाची आर्थिक भागवण्यासाठी त्यांनी त्या स्वीकारल्या.
संजीव कुमार यांनी आर्थिक अडचणींमुळे सी-ग्रेड चित्रपट केले
‘मेरी सहेली पॉडकास्ट’मध्ये बोलताना हनीफ यांनी संजीव कुमार यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. संजीव कुमार यांनी चित्रपटांत नशीब आजमावण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांचे कुटुंब खूप मोठ्या आर्थिक संकटात होते. वडिलांच्या बिझनेसमध्ये नुकसान झालं होतं, तो बिझनेस त्यांची आई चालवत होती. संजीव कुमार यांच्याकडे घालण्यासाठी फक्त दोनच जोड कपडे होते. “आपण करतोय ते चित्रपट सी-ग्रेड आहेत याची त्यांना कल्पनाही नव्हती. आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्याने समोर येईल ते काम ते करायचे,” अशी आठवण झवेरी यांनी सांगितली.
संजीव कुमार यांनी सुलक्षणा पंडित यांच्याशी लग्न का केलं नाही?
संजीव कुमार यांच्या अभिनयाने आघाडीच्या दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेतले. मग त्यांनी सी-ग्रेड सिनेमे करणं सोडलं. पण वैयक्तिक आयुष्यातील प्रेमभंगामुळे ते अस्वस्थ होते. हेमा मालिनी आणि नूतन यांच्याबरोबरचं त्यांचं नातं संपलं. मग त्यांच्या आयुष्यात सुलक्षणा पंडित आल्या. सुलक्षणांचं संजीव कुमार यांच्यावर प्रेम होतं. हनीफ झवेरी यांच्यामते, संजीव कुमार यांना सुलक्षणा आवडत होत्या, पण आपण तरुणपणीच मरणार या भीतीपोटी त्यांना कोणाशीही लग्न करायचं नव्हतं.

झवेरी म्हणाले, “सुलक्षणा पंडित यांना भेटण्यापूर्वीच संजीव कुमार यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या कुटुंबातील सर्व पुरुषांचा मृत्यू पन्नाशी गाठण्यापूर्वीच झाला होता, त्यामुळे आपलाही मृत्यू ५० वर्षांपूर्वीच होईल, अशी त्यांना खात्री झाली. लग्न करून कोणाचं आयुष्य खराब करायचं नाही या एकमेव कारणामुळे त्यांनी लग्न केलं नाही.”
संजीव कुमार यांनी मित्रांना ९६ लाख रुपये दिले, त्यांनी परत दिलेच नाही
संजीव कुमार ‘कंजूष’ होते, या अफवा पूर्णपणे खोट्या होत्या, असं हनीफ यांनी सांगितलं. “त्यांनी आपल्या मित्रांना कर्ज म्हणून ९६ लाख रुपये दिले होते, ते मित्रांनी कधीच परत केले नाहीत. त्यांनी आपल्या ड्रायव्हरच्या लग्नाचा खर्च उचलला, एका मित्राला कार भेट दिली. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात ड्रायव्हरच्या मुलाच्या शिक्षणासाठी २ लाख रुपये ठेवल्याचं नमूद केलं होतं. कंजूष लोक असं करत नाहीत. त्यांना फालतू खर्च आवडायचा नाही,” असं झवेरी म्हणाले.
शत्रुघ्न सिन्हा यांनाही केली होती मदत
एकदा शत्रुघ्न सिन्हा यांना पैशांची गरज होती तेव्हा संजीव कुमार यांनी स्वतःहून दिले होते. “शत्रुघ्न सिन्हांनी न मागता संजीव कुमार यांनी त्यांना पैसे दिले होते. बोनी कपूरना पैसे हवे होते, त्यांनी दिले होते. संजीव कुमार यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांनी त्यांच्या कुटुंबाला पैसे परत दिले होते, तेव्हा कुटुंबियांना माहीत नव्हतं की संजीव कुमार यांनी त्यांना पैसे दिले होते,” असं हनीफ झवेरी म्हणाले.
दरम्यान, संजीव कुमार यांचे १९८५ साली अवघ्या ४७ व्या वर्षी निधन झाले.
