Sanjeev kumar warned anju mahendru about Rajesh Khanna: राजेश खन्ना यांच्या अभिनयाबद्दल आज जितके बोलले जाते, तितकेच त्यांचे अनेक किस्सेही सांगितले जातात. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या रिलेशनशिपबद्दलही बऱ्याचदा बोलले जाते.
राजेश खन्ना आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्या रिलेशनशिपचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. जेव्हा राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया यांच्याशी लग्नगाठ बांधली. तेव्हा त्यांनी लग्नाची वरात मुद्दाम अंजू महेंद्रू यांच्या घरासमोरून नेली, असे म्हटले जाते. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्या नात्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली.
आता ज्येष्ठ पत्रकार व लेखक हनीफ झवेरी यांनी याबाबत एक खुलासा केला आहे. त्यांनी दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे नाव अॅन अॅक्टर लाईफ : द ऑथोराइज्ड बायोग्राफी ऑफ संजीव कुमार, असे आहे. तसेच, त्यांनी संजीव कुमार यांची भाजी जिग्ना शाह यांना एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीतील त्यांची वक्तव्ये लक्ष वेधून घेत आहेत.
“मला संजीवने सांगितले होते की, राजेश खन्ना खूप…”
हनीफ झवेरी म्हणाले, “संजीव कुमार, राजेश खन्ना व अंजू महेंद्रू हे तिघे खूप चांगले मित्र होते. त्यामुळेच संजीव कुमार यांनी अंजू महेंद्रू यांना राजेश खन्ना यांच्याबद्दल सावधानता बाळगण्यास सांगितले होते. अंजू महेंद्रू म्हणाल्या होत्या की, मला संजीवने सांगितले होते की, राजेश खन्ना खूप संशय घेणारे व्यक्ती आहेत. त्यांच्याबरोबर आयुष्य जगले जाऊ शकत नाही. जर तू त्याच्याबरोबर लग्न केलेस, तर तू कधीही आनंदी राहणार नाहीस.”
हनीफ झवेरी पुढे असे म्हणाले, “अंजू महेंद्रू असेही म्हणालेल्या की, मी संजीव कुमार यांना डेट करत आहे, असा संशय राजेश खन्नांना होता. तिथून माझ्या आणि राजेशमधील भांडणांना सुरुवात झाली होती. याच कारणामुळे संजीव आणि राजेश यांच्यात कायम तणाव असे”, असे म्हणत हनीफ जवेरी अंजू महेंद्रू यांनी त्यांना काय सांगितले होते ते सांगितले.
आणखी एका आठवण सांगत ते म्हणाले, “जेव्हा जे. ओमप्रकाश यांनी आप की कसम या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. त्यावेळी इंडस्ट्रीमधील अनेक लोकांनी फोन करून त्यांना सांगितले होते की, संजीव कुमार आणि राजेश खन्ना यांना एकत्र घेऊन काम करणे अवघड आहे. त्यांना दोघांना एकत्र कास्ट करणे मोठी चूक ठरू शकते. त्यांच्यात असणाऱ्या तणावामुळे चित्रपट अपूर्ण राहू शकतो, असे त्यांना अनेकांनी सांगितले होते.”
