Sanju Rathod Gulabi Saree Teaser release : आपल्या हटके आणि मराठमोळ्या शैलीने अवघ्या देशाला वेड लावणारा गायक संजू राठोड आता बॉलीवूड गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२४ मध्ये सोशल मीडियावर इतिहास रचणाऱ्या त्याच्या ‘गुलाबी साडी’ या सुपरहिट गाण्याचे हिंदी व्हर्जन आता थेट ‘धमाल ४’ या मोठ्या बॉलीवूड चित्रपटात पाहायला मिळणार आहे. संजूने नुकताच ‘साडी’ या नव्या हिंदी गाण्याची झलक (टीझर) सोशल मीडियावर शेअर केली आहे. या गाण्यात स्वतः संजू राठोडसोबत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री अंजली आनंद गुलाबी साडी नेसून थिरकताना दिसत आहेत.
गायक संजू राठोडचे ‘गुलाबी साडी’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले असून सोशल मीडियावर त्याची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली होती. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी या गाण्यावर रील्स तयार केल्या होत्या. तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय ठरलेल्या या गाण्याचे आता हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संजू राठोडने नुकतीच ‘साडी’ या नव्या हिंदी गाण्याचा टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे.
रितेश देशमुखसह अंजली आनंदने शेअर केली स्क्रीन
या गाण्यात अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री अंजली आनंद दमदार नृत्य करताना दिसत आहेत. अंजलीने गुलाबी रंगाची साडी नेसली असून रितेशने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट स्टाईल केला आहे. विशेष म्हणजे या गाण्यात संजू राठोडदेखील झळकणार आहे. संजूच्या लोकप्रिय ‘गुलाबी साडी’ गाण्यानंतर तयार करण्यात आलेले ‘साडी’ हे गाणे आगामी ‘धमाल ४’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘साडी’ गाण्याचा टीझर प्रदर्शित
गायक संजू राठोडचे ‘गुलाबी साडी’ हे मराठीतील अतिशय लोकप्रिय गाणे २०२४ मध्ये प्रचंड व्हायरल झाले होते. आजही या गाण्याची जादू तरुणाईमध्ये कायम असून सोशल मीडियावर लाखो रील्स या गाण्यावर तयार करण्यात आल्या होत्या. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशातही या गाण्याने नवे विक्रम रचले होते. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनीही या गाण्यावर रील्स शेअर केल्या होत्या. आता संजू राठोडने याच गाण्याचे हिंदी रूपांतर ‘साडी’ या नावाने सादर केले असून हे गाणे येत्या २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘धमाल ४’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता
विशेष म्हणजे हे गाणे आगामी ‘धमाल ४’ चित्रपटाचा भाग असणार आहे. ‘धमाल’ फ्रँचायझीमधील चौथा भाग असलेल्या या बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले आहे. चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा आणि जॉनी लिव्हर यांसारखे लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठकेरिया, आनंद पंडित आणि इंद्र कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विनोद, गोंधळ आणि भरपूर मनोरंजनाचा तडका असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच ‘साडी’ या गाण्याच्या झलकने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
