लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने यामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. तर, मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर या सिनेमात रायाजींच्या भूमिकेत झळकला होता. ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यावर संतोषने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं पण, याचदरम्यान संतोषला ट्रोलिंगचा सामना सुद्धा करावा लागला होता.

‘छावा’च्या सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाशी न बोलल्याचं वक्तव्य संतोषने केलं होतं. ट्रोलिंगनंतर माझं म्हणणं चुकीच्या पद्धतीने पोहोचल्याचं संतोषने स्पष्ट केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने आपली बाजू स्पष्ट करत अक्षय खन्ना खूप चांगला अभिनेता असल्याचं म्हटलं आहे.

संतोष जुवेकर ‘सर्व काही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “छावाच्या वेळेला जे काही ट्रोलिंग झालं…खरंतर मी खूपच छान विचार करून बोललो होतो आणि माझे विचारही खूप चांगले होते पण, ते चुकीच्या पद्धतीने पोहोचले…तो पॉडकास्ट लोकांनी पूर्ण पाहिलाच नाही. आजकाल लोक पूर्ण काय घडलंय हे ऐकूनच घेत नाहीत, कोणी पूर्ण पाहतच नाहीत आणि त्यावर मत देऊन मत मोकळे होतात.”

त्यानंतर अक्षय खन्नाशी पुन्हा कधी बोलणं झालं का? यावर संतोष म्हणाला, “नाही…नाही कधीच भेट झाली नाही! तो खूप मोठा अभिनेता आहे आणि छावामध्ये माझं काम विकी कौशलबरोबर होतं कारण, आम्ही सगळे मावळे महाराजांचं जे अष्टक मंडळ होतं त्यातले होतो. त्यामुळे अक्षय खन्नाशी कधी भेट झाली नाही. मी पडद्यावरच त्याचं काम पाहिलं आणि तो खरंच खूप उत्तम अभिनेता आहे नो डाऊट…! त्याची आधीपासूनची कामं आहेत जी मला खूप आवडतात.”

रॅपिड फायरमध्ये संतोष जुवेकरसमोर काही कलाकारांची नावं घेण्यात आली आणि त्या कलाकाराबद्दल त्याच्या भावना एका शब्दांत व्यक्त करण्यास सांगितल्या. विकी कौशलचं नाव ऐकताच संतोष म्हणाला, “व्हेरी हार्ड वर्किंग सुपरस्टार, तर अक्षय खन्नाबद्दल संतोष म्हणाला, सुपर Actor!”

याशिवाय अंकुश चौधरीबद्दल संतोष म्हणाला, “द मोस्ट लव्हेबल, सर्वांची काळजी करणारा आणि आताचा महाराष्ट्राचा आवडता सुपरस्टार!” विजू माने आणि अवधूत गुप्ते या दोघांनाही संतोषने ‘फ्रेंड फिलोसोफर अँड गाइड’ची उपमा दिली आहे.