Santosh Juvekar Ganpati Bappa Mumbai Traffic Post: लवकरच गणेशोत्सव सुरू होणार असून मुंबईमध्ये गणपती बाप्पा मंडपामध्ये आणण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मुंबईतील रस्ते गजबजले असून सर्वत्र जल्लोषाचं वातावरण आहे. मात्र यामुळं वाहतूक कोंडीसुद्धा होत आहे. या वाहतूक कोंडीत गणपती बाप्पासुद्धा अडकला असून याचा खास फोटो लोकप्रिय मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संतोष जुवेकरनं इन्स्टाग्रामवर गणरायाचा एक फोटो शेअर केला. यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत असून, गणेश मंडळाकडून सुंदर मूर्ती आणली जात असल्याचं दिसत आहे. मात्र रस्त्यात वाहतूक कोंडी झाल्यानं गणरायाचा रथ रस्त्यात अडकल्याचं दिसून येत आहे. गाडीतून प्रवास करत असताना संतोष जुवेकरनं याचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच पोलिसांसाठी खास आवाहन केलं आहे.
काय आहे संतोष जुवेकरची पोस्ट ?
गणपती बाप्पाचा फोटो शेअर करत संतोष जुवेकरनं लिहिलं, “बघाना बाप्पा आपण दोघंही ट्रॅफिकमध्ये अडकलोय. पण तू मात्र ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणाल्यावर वेळेत पोहोचतोस आणि आम्ही मात्र ट्रॅफिकमध्येच वेळ काढत बसतो. बाप्पा या ट्रॅफिकचा गुंता सोडवणाऱ्या आम्हा सगळ्यांना ट्रॅफिकचे नियम पाळण्याची आणि शिस्तीत गाडी चालवण्याची सुबुद्धी देरे महाराजा.”
पुढे लिहिलं, गणराया, “तुझ्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्तात रात्रंदिवस उन्हा-पावसात रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या माझ्या पोलीस भावा-बहिणींना आशीर्वाद आणि ऊर्जा शक्ती दे. त्यांना सहकार्य करायची आम्हालाही सुबुद्धी दे महाराजा. गणपती बाप्पा मोरया.” अशा आशयाची पोस्ट करत संतोष जुवेकरनं मुंबईतील वाहतूक कोंडीवर त्याचं मत व्यक्त केलं आहे.
संतोष जुवेकरनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या हा गणपती दक्षिण मुंबईचा महागणपती असल्याचं नेटकऱ्यांनी सांगितलं आहे. ही मूर्ती पूर्णपणे कागदापासून बनवण्यात आली असून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संतोष जुवेकरचे फोटो काढल्याबद्दल धन्यवाद मानले आहेत.
दरम्यान, संतोष जुवेकरने गणपती मंडळ आणि त्यातील कार्यकर्ते याची गोष्ट मांडणारा ‘मोरया’ सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याच्या मोरया सिनेमातील भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. २०११ साली आलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन अवधूत गुप्ते यांनी केलं होतं. यातील गणेशोत्सव आणि त्यामागील राजकारण व कार्यकर्त्यांच्या भावना मांडण्यात आल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी संतोष जुवेकरचा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. यापूर्वी त्याने लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या सिनेमात ‘रायाजी’ ही प्रभावी भूमिका साकारली होती.
