Santosh Juvekar & Manoj Bajpayee : ‘मोरया’, ‘झेंडा’, ‘एक तारा’ या मराठी सिनेमांपासून ते ‘छावा’ सारख्या हिंदी सिनेमापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजेच संतोष जुवेकर. आजवर त्याने अनेक बॉलीवूड स्टार्सबरोबर काम केलेलं आहे. संतोषच्या अभिनयाचं सुद्धा कायम कौतुक केलं जातं. काही वर्षांपूर्वी संतोष एका मराठी मालिकेत काम करत होता आणि त्या मालिकेच्या सेटवर तो पहिल्यांदाच बॉलीवूडचे स्टार अभिनेते मनोज बाजपेयींना भेटला.
याच मालिकेच्या सेटवर एकदा तरी मनोज बाजपेयींबरोबर मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करायचं असं स्वप्न संतोषने पाहिलं होतं. हे स्वप्न ‘भोंसले’ सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झालं. यादरम्यानचा अनुभव संतोषने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
संतोष सांगतो, “मनोज बाजपेयी यांची सहसा कोणीही मिमिक्री करत नाही कारण, त्या माणसाने आजवर एकही भूमिका सेम केलेली नाहीये. त्यांची प्रत्येक भूमिका वेगळीये. मी खरंच नशीबवान आहे कारण, मी ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत काम करत होतो आणि त्याचवेळी मनोज सरांचा ‘बुधिया सिंह – बॉर्न टू रन’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ते आमच्या मालिकेत आले होते. सकाळी सेटवर गेल्यावर मला समजलं की, ते येणार आहेत आणि माझ्याबरोबरच त्यांचा सीन होता. मी तेव्हा त्यांच्याकडे पाहून बोललो होतो की, एक दिवस या माणसाबरोबर काम करायचंय आणि मी करणार…”
“या गोष्टीला तीन-चार महिने झाले आणि नंतर मला एका कास्टिंग डिरेक्टरचा फोन आला. मी ऑडिशनला गेलो…सगळं छान झालं. त्यानंतर दोन दिवसांनी मला देवाशिष मखीजांचा फोन आला. आमचं फोनवर बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटायला गेलो.”
अभिनेता ‘सर्व काही’ युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पुढे म्हणाला, “मी त्यांना भेटायला पोहोचलो…त्यांची संपूर्ण टीम बसली होती. मला पाहून देवाशिष सरांनी टाळ्या वाजवल्या आणि ते म्हणाले, हा आहे माझा विलास! ते म्हणाले, ‘संत्या तुझे मैने १० साल पहले देखा है!’ त्यांनी ‘झेंडा’ सिनेमा पाहिला होता. तो सिनेमा पाहूनच मला ऑडिशनसाठी बोलावलं होतं. त्यांना फक्त हेच पाहायचं होतं की, मी तसाच दिसतो की नाही. पुढे नंतर मला समजलं की मनोज सर लीड करत आहेत. तर, भोंसले सिनेमाच्या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत काम करायला मिळालं.”
“त्या सिनेमानंतर माझी आणि बाजपेयींची खूप छान मैत्री झाली… म्हणजे एकदम अमेझिंग मैत्री! आजही त्यांचा मेसेज येतो…ज्या व्यक्तीला आपण आदर्श मानतो, ज्यांचा सिनेमा पाहून आपणही अभिनेता, हिरो होऊयात का असा विचार मी केला होता… अशा व्यक्तीबरोबर काम करणं, त्याचा नंबर माझ्याकडे असणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणूनच मी कायम म्हणतो, की I’m So Blessed!” अशा भावना संतोषने व्यक्त केल्या आहेत.
