Sanya Malhotra wins Best Actor female OTT Film: पुरस्कार सोहळ्यांमध्ये गुणवंताच्या कामाचे कौतुक केले जाते. त्यांच्या आगामी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जातात. याबरोबरच, अनेक कलाकारांना एकत्र पाहण्याची, त्यांच्या कामाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते.

सान्या मल्होत्रा ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

५ एप्रिल २०२६ ला मुंबईत चेतक स्क्रीन पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला. अभिनेत्री सान्या मल्होत्राला Mrs या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी ओटीटी चित्रपट विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने गौरविण्यात आले.

या पुरस्कारासाठी खूप चुरशीची स्पर्धा होती. नामांकनांमध्ये आप जैसा कोई सिनेमासाठी फातिमा सना शेख, सिस्टर मिडनाईट सिनेमासाठी राधिका आपटे, सॉन्स ऑफ पॅराडाइजसाठी सबा आझाद, स्टोलन सिनेमासाठी मिया मेल्झर, याबरोबरच, फरीदा जलाल, श्रेया चौधरी अशा लोकप्रिय अभिनेत्रींचा समावेश होता.

हा पुरस्कार दिग्दर्शिका झोया अख्तर यांच्या हस्ते सान्याला प्रदान करण्यात आला आणि तो सोहळ्यातील खास क्षण ठरला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलिया भट्ट हिने केले. तर विनोदी कलाकार झाकीर खान आणि सुनील ग्रोव्हर यांनी आपल्या विनोदाने सर्वांना खळखळून हसवले.

द इंडियन एक्सप्रेस तर्फे सुरू करण्यात आलेले चेतक स्क्रीन अवॉर्ड्स हे भारतातील सर्वात विश्वासार्ह चित्रपट पुरस्कारांपैकी एक मानले जातात.
चेतक स्क्रीन अवॉर्ड्ससाठी नामांकन आणि विजेत्यांची निवड स्क्रीन अकादमी या स्वतंत्र आणि ना-नफा संस्थेने केली. या संस्थेत ५३ चित्रपट निर्माते, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष राहिली.

सान्या मल्होत्राच्या Mrs सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. हा सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

सिनेमात दाखवल्याप्रमाणे, एक मुलगी लग्न होऊन तिच्या सासरी जाते. सुरुवातीला सर्व काही छान असते. पण, पुढे की जबाबदाऱ्यांमध्ये अडकते, तिला कोणी मदत करत नाही. तिला डान्स करायला आवडत असते, पण त्यावरही बंधने येतात. ती फक्त घरकामांमध्ये अडकते. पण, शेवटी ती असा एक निर्णय घेते, त्यामुळे तिच्या घरच्यांना धक्का बसतो. सान्याच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.

आता आगामी काळात सान्या कोणत्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.