Actress Sara Ali Khan Kedarnath Temple Visit : सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मोठी मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान प्रचंड धार्मिक आहे. देशभरातील विविध मंदिरांना ती भेट देत असते. साराने २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून अभिनेत्री दरवर्षी केदारनाथला जाते. पण, आता इथून पुढे सारासाठी तीर्थयात्रा करणं सोपं राहिलेलं नाहीये. कारण, आता उत्तराखंडमधील मंदिर समितीने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. केदारनाथ-बद्रीनाथसह राज्यातील ४५ मंदिरांमध्ये प्रवेशाबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
हिंदू नसलेल्या भाविकांना जर या मंदिरांमध्ये दर्शन घ्यायचं असेल तर, त्यांना आपली सनातन धर्मावर श्रद्धा असल्याचं लेखी ‘प्रतिज्ञापत्र’ सादर करावं लागणार आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, बीकेटीसी ( बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती ) समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी म्हणाले, “जे हिंदू नाहीत आणि ज्यांना केदारनाथ-बद्रीनाथसह अन्य मंदिरात दर्शन घ्यायचं असेल त्यांना आमची हिंदू धर्मावर श्रद्धा आहे असं प्रतिज्ञापत्र सादर करणं अनिवार्य असेल. “मी सनातनी आहे; माझा हिंदुत्वावर विश्वास आहे” याचा लेखी पुरावा सादर केल्यास कोणत्याही धर्माच्या किंवा पार्श्वभूमीच्या भाविकांना दर्शन घेता येईल.”
“जर सारा अली खानने सनातन धर्मावर श्रद्धा व भक्ती असल्याचं जाहीर केलं आणि तसं प्रतिज्ञापत्र सादर केल्यास, आम्ही तिलाही प्रार्थना करण्याची परवानगी देऊ” असं हेमंत द्विवेदी यांनी स्पष्ट केलं आहे. या घोषणापत्रासाठी मंदिर समितीने एक विशिष्ट फॉर्म फॉरमॅट देखील तयार केला असल्याची माहिती यावेळी द्विवेदी यांनी दिली आहे.
दरम्यान, २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सारा अली खान दरवर्षी या मंदिरात भगवान शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी जाते. आतापर्यंत जवळपास सहा-सात वेळा तिने सलग केदारधामचं दर्शन घेतलं आहे. अनेकदा ‘केदारनाथ’चे फोटो शेअर केल्यावर तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. पण, साराने केदारनाथशी खूपच जवळचं नातं निर्माण झाल्याचं अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
