आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा सर्वात मोठ्या भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या स्पाय थ्रिलरने चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले. या चित्रपटातील कलाकारांनाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. धुरंधरमधील अक्षय खन्नाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, सारा अर्जुनची रणवीर सिंहबरोबरची केमिस्ट्रीही चर्चेचा विषय ठरली. या चित्रपटात यालिना जमालीची भूमिका साकारणाऱ्या साराने सांगितलं की ‘धुरंधर’ पाहिल्यानंतर तिचे पालक अभिनेते राज अर्जुन व सान्या अर्जुन यांनी कशी प्रतिक्रिया दिली.

‘धुरंधर’ हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने भारतात १,००० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्याबरोबर सारा अर्जुनने मुख्य भूमिका साकारली. सारा अर्जुनने खुलासा केला की ‘धुरंधर’ पाहिल्यानंतर तिचे आई-वडील रडले.

मी केलेल्या एका गोष्टीमुळे… – सारा अर्जुन

सुमा कनाकलाला दिलेल्या एका मुलाखतीत, साराला तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता? असं विचारण्यात आलं. त्यावर तिने सांगितलं की जेव्हा तिच्या आई-वडिलांनी तिचा ब्लॉकबस्टर बॉलिवूड चित्रपट ‘धुरंधर’ पाहिला, तो क्षण तिच्यासाठी सर्वात आनंदाचा होता. “एके दिवशी जेव्हा मी केलेल्या एका गोष्टीमुळे माझे आई-वडील दोघेही आनंदाने रडत होते. त्यामुळे तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण होता. तो दिवस, त्यांचे अश्रू माझ्यासाठी खूप खास होते,” असं तिने सांगितलं. ती ‘धुरंधर’ चित्रपटाबद्दल बोलतेय का, असं सुमाने विचारल्यावर सारा हसली आणि ‘हो’ म्हणाली.

फिल्म इंडस्ट्रीतील तिच्या प्रवासाबद्दल बोलताना सारा म्हणाली, “पोन्नियिन सेल्वननंतर मी बोर्डिंग स्कूलमध्ये गेले, आणि त्यानंतर माझा विचार परदेशात जाऊन चित्रपट आणि अभिनय शिकण्याचा होता. पण जेव्हा मी बोर्डाच्या परीक्षा देत होते, तेव्हाच मी ‘मॅजिक’ चित्रपट साइन केला. नंतर ‘युफोरिया’ची ऑफर आली, तो करण्याची माझी इच्छा झाली. PS2 नंतर ‘मॅजिक’, मग ‘युफोरिया’ आणि त्यानंतर ‘धुरंधर’. खरं तर, मी ‘युफोरिया’च्या शूटिंगदरम्यानच ‘धुरंधर’ साइन केला.”

कामाबद्दल बोलायचं झाल्यास सारा अर्जुन सध्या तिच्या आगामी ‘युफोरिया’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे.