Sardaar Ji 3 Box Office Collection : दिलजीत दोसांझच्या वादग्रस्त ‘सरदार जी 3’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने महत्त्वाची भूमिका केली आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमधील कलाकारांवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) बंदी घातली. त्या पार्श्वभूमीवर हानियाला ‘सरदार जी 3’ घेण्यात आल्याने मोठा विरोध झाला. सिनेमाच्या टीझर व ट्रेलरमध्ये हानियाला पाहून भारतीयांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट भारतात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता व लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ ‘सरदार जी 3’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. हानियामुळे पंजाबी हॉरर कॉमेडी ‘सरदार जी 3’ वादात अडकला असला तरी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. वादामुळे निर्मात्यांना भारत वगळता इतर देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला. पाकिस्तानमध्येही ‘सरदार जी 3’ रिलीज करण्यात आला आहे. तिथेही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सरदार जी 3 चे तीन दिवसांचे कलेक्शन

निर्मात्यांच्या मते, ‘सरदार जी 3’ ने अवघ्या तीन दिवसांत जगभरात १८.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शुक्रवारी, २७ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी ४.३२ कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने विदेशात दमदार ओपनिंग केली. वीकेंडला सिनेमाच्या कमाईत वाढ झाली. ‘सरदार जी 3’ ने दुसऱ्या दिवशी ६.७१ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी जागतिक स्तरावर ७.०७ कोटी रुपयांची कमाई केली. ‘सरदार जी 3’ चे तीन दिवसांचे कलेक्शन आता १८.१ कोटी रुपये झाले आहे.

‘सरदार जी 3’ च्या चौथ्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी अद्याप आलेली नाही. पण सुरुवातीच्या तीन दिवसांचे कलेक्शन पाहता जर सध्याचा ट्रेंड असाच राहिला आणि चित्रपटाची कमाई अशीच राहिली तर ‘सरदार जी 3’ या फ्रँचायझीच्या आधीच्या दोन भागांनी केलेल्या कलेक्शन रेकॉर्डला मागे टाकेल. भारतात रिलीज न झाल्याचा फटका या चित्रपटाला नक्कीच बसला आहे, पण तरी विदेशात चित्रपटाने केलेल्या कमाईची चर्चा होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सरदार जी 3’ हा पाकिस्तानमध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ‘सरदार जी ३’ ने पाकिस्तानमध्ये पहिल्या दिवशी ३.५ कोटी पाकिस्तानी रुपये कमावले. या सिनेमाने अली अब्बास जफर यांच्या ‘सुल्तान’चा विक्रम मोडला. सलमान खान, अनुष्का शर्मा आणि रणदीप हुड्डा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या ‘सुल्तान’ने पाकिस्तानमध्ये पहिल्या दिवशी ३.४ कोटी पाकिस्तानी रुपये कमावले होते.