Sonali Bendre Dance Struggle with Saroj Khan : ९०च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी सोनाली बेंद्रे आजही अनेकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पण, आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सोनालीला मात्र डान्स सीन्सची खूप भीती वाटायची असा खुलासा तिने नुकताच केला आहे. महत्त्वाचं म्हणजे तिने कधीच नृत्याचं प्रक्षिशन घेतलं नव्हतं.

एका मुलाखतीत बोलताना सोनालीने सांगितलं की, चित्रपटातील गाणी तिच्यासाठी सर्वात मोठं आवाहन असायचे. “चित्रपटांमध्ये गाणं शूट करणं म्हणजे माझ्यासाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखं होतं. मी ट्रेन्ड डान्सर नाहीये” असं ती म्हणाली आहे. तिने पुढे सांगितलं की, कथेशी जोडलेली गाणी तिला आवडायची. पण जेव्हा फक्त डान्सवर लक्ष केंद्रित करावं लागायचं, तेव्हा तिची भीती आणखी वाढायची. डान्स शूटच्या आधी तणावामुळे तिला रात्रभर झोप यायची नाही.

सरोज खान म्हणालेल्या असं काही की…

सोनालीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांतील एक खास अनुभवही सांगितला. English Babu Desi Mem हा चित्रपट साइन करतानाच तिने दिग्दर्शक प्रवीण निश्‍चोल यांना तिला डान्स येत नसल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. यानंतर प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान चित्रपटाशी जोडल्या गेल्या आणि यामुळे सोनालीचा ताण आणखी वाढला. सोनालीच्या मते, सरोज खान सुरुवातीपासूनच तिच्या डान्सबद्दल नाराज होत्या. “या हिरोईनला डान्सही येत नाही” असं म्हणत त्या रागाने निघून गेल्या होत्या. असं अभिनेत्रीने सांगितलं आहे

या घटनेमुळे सोनालीचा आत्मविश्वास कमी झाला होता. इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी ती मेहनत करत असताना हा अनुभव तिच्यासाठी खूप त्रासदायक होता. पण, याच काळात कोरिओग्राफर अहमद खान यांनी तिला मदत केली. त्या वेळी अहमद खान हे सरोज खान यांना असिस्ट करत होते. सोनालीने सांगितलं की, अहमद खानबरोबर ती सकाळी डान्सची रिहर्सल करायची.

आज सोनाली बेंद्रेच्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. मात्र त्या गाण्यांमागे तिचा संघर्ष, भीती आणि मेहनत दडलेली होती, हे आता तिने तिचा अनुभव सांगितल्यानंतर कळतं.