बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आंतरधर्मीय लग्न केलं आहे. तर काहींनी त्यांच्या आवडत्या व्यक्तीसह लग्ना करण्यासाठी धर्मांतरही केलं. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे सईदा खान. मात्र लग्नानंतर सईदा खान यांच्याबरोबर एक मोठा अपघात झाला आणि त्यांचा शेवट खूप वाईट झाला. त्यांच्या पतीनेच त्यांची गोळी झाडून हत्या केली होती.
न्यूज १८च्या वृत्तानुसार सईदा खान यांनी अवघ्या ११व्या वर्षी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. दिग्दर्शक एच. एस. रवैल यांनी एका पार्टीत त्यांना पाहिलं आणि त्यांची ‘कांच की गुडिया’ या चित्रपटासाठी निवड केली. हा चित्रपट १९६१मध्ये प्रदर्शित झालेला. या चित्रपटात त्यांनी मनोज कुमार यांच्याबरोबर मुख्य नायिकेची भूमिका साकारली.
लग्नानंतर अभिनयातून घेतला ब्रेक
सईदा यांनी किशोर कुमार यांच्याबरोबर ‘अपना हाथ जगन्नाथ’ या चित्रपटातही काम केलं. याशिवाय ‘मॉडर्न गर्ल’, ‘वॉन्टेड’, ‘फ्लॅट नंबर ९’, ‘हम मतवाले नौजवान’, ‘एक साल पहले’, ‘कन्यादान’ आणि ‘वासना’ हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट होते. चित्रपटांच्या ऑफर्स कमी होत गेल्यानंतर सईदा खान यांनी उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी सहाय्यक भूमिकाही स्वीकारण्यास सुरुवात केली. १९६०च्या दशकाच्या अखेरीस त्यांना काम मिळणं कमी झालं. त्यानंतर दिग्दर्शक आणि निर्माते बृज सदाना (Brij Sadanah) यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांनी अभिनयातून ब्रेक घेतला.
सईदा खान यांनी धर्मांतर केल्यानंतर बदललं नाव
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार सईदा खान यांनी बृज सदाना यांच्याशी लग्न केल्यानंतर हिंदू धर्म स्वीकारला आणि सुधा सदाना या नावाने नवीन आयुष्याची सुरुवात केली. या दाम्पत्याला नम्रता ही मुलगी आणि कमल हा मुलगा, अशी दोन अपत्यं होती. मात्र सईदा खान आणि प्रसिद्ध लेखिका शगुफ्ता रफिक यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. शगुफ्ता यांचा सांभाळ सईदा यांच्या आई अनवरी बेगम यांनी केला होता. पुढे शगुफ्ता यांनी सांगितलं की, त्या सईदा यांच्यासारख्या दिसत असल्याने अनेकांना सईदा त्यांची खरी आई असल्याचा गैरसमज होता.
शगुफ्ता यांनी Filmfareला दिलेल्या मुलाखतीतही सांगितलं होतं की, लहानपणी अनेकजण त्यांना सईदा त्यांच्या आई असल्याचं सांगायचे. मात्र, त्यांनी सईदा यांना आईपेक्षा बहीण म्हणूनच पाहिलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शगुफ्ता रफिक यांनी सांगितलं की, एकदा अनवरी बेगम यांनी त्यांना बजावलं होतं की, कोणी सईदा खान त्यांची आई आहे का, असं विचारलं तर हो असं सांगायचं. पुढे शगुफ्ता यांनी असंही म्हटलं की, सईदा त्यांच्याशी खूप प्रेमाने आणि आपुलकीने वागायच्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या भूतकाळातील काही गोष्टी समजून घेण्याचा त्या प्रयत्न करत राहिल्या.
पतीनेच केली हत्या
शगुफ्ता यांच्यानुसार, यामुळे बृज सदाना अस्वस्थ होते. त्यांना असा संशय होता की, सईदा खान यांनी त्यांच्याशी लग्न करण्यापूर्वी एका मुलाला जन्म दिला होता. मात्र, या शंकेनंतरही बृज सदाना यांनी शगुफ्ता आणि अनवरी बेगम यांना आर्थिक मदत केली, असं शगुफ्ता यांनी सांगितलं. २१ ऑक्टोबर १९९० रोजी बृज व सईदा यांचा मुलगा कमल सदानाच्या २०व्या वाढदिवसाच्या दिवशी सेलिब्रेशनची तयारी सुरू असताना त्यांच्या घरात गोळीबाराची घटना घडली. बृज सदाना यांनी सईदा, नम्रता आणि कमल यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतली. या घटनेत सईदा,बृज आणि नम्रता यांचा मृत्यू झाला मात्र त्यांचा मुलगा कमल बचावला. यानंतर कमल सदानाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. १९९२ मध्ये ‘बेखुदी’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात काजोल मुख्य भूमिकेत होती.
