सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि अभिनेते सलीम खान आज त्यांचा ८७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत सलीम खान यांचं योगदान अत्यंत मौल्यवान आहे. १९३५ मध्ये इंदौरमध्ये जन्मलेल्या सलीम खान यांनी कित्येक अजरामर चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीने कित्येक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. कालांतराने ही जोडी वेगळी झाली. जावेद अख्तर यांनी पुढे चित्रपटसृष्टीत काम सुरू ठेवलं, पण सलीम खान यांनी नंतर जास्त काम केलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलीम खान हे त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीसुद्धा बरेच चर्चेत होते. मनोरंजनसृष्टीत सलीम खान आणि हेलन या जोडीच्या भरपूर चर्चा रंगल्या, आज आपण त्यांच्याच प्रेमकहाणीबद्दल जाणून घेणार आहोत. कुटुंबाचा विरोध पत्करून सलीम खान यांनी हेलन यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. ‘हेलन’ यांना चित्रपटसृष्टीत ‘आयटम गर्ल’ ही ओळख मिळाली आणि त्यानंतर त्यांना त्यासाठीच चित्रपटात घेतलं जाऊ लागलं.

यादरम्यान हेलन यांची सलीम खान यांच्याशी ओळख झाली, या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि बॉलिवूडमध्ये यांच्या नात्याबद्दल भरपूर चर्चा व्हायला सुरुवात झाली. सलीम यांच्यामुळे हेलन यांना बऱ्याच चित्रपटात भूमिका मिळाल्या पण त्यांच्यावर लागलेला ‘आयटम गर्ल’ हा ठपका कायम तसाच राहिला.

आणखी वाचा : तापसी पन्नूची नवी इनिंग, अभिनेत्री दिसणार नव्या भूमिकेत; आगामी थरारपट ओटीटीवर

सलीम खान यांनी १९६४ साली सुशील चारक यांच्याशी लग्न केलं होतं. सलमान, अरबाज, सोहेल आणि अलवीरा ही सलीम खान आणि सुशीला यांची चार अपत्य. सलीम खान आणि हेलन यांच्यातील नात्याबद्दल उघडपणे चर्चा होऊ लागली तेव्हा सलीम खान यांच्या घरून प्रचंड विरोध होऊ लागला. सलीम खान यांच्या मुलांनाही ही गोष्ट खटकत असल्याची चर्चा होत होती.

हा सगळ्या विरोधाला न जुमानता सलीम खान यांनी १९८१ साली हेलन यांच्याशी लग्न केलं. सुरुवातीला त्यांच्या घरच्यांनी याला विरोध दर्शवला, पण नंतर हळूहळू त्यांनीदेखील ही गोष्ट स्वीकारली आणि आज हेलन ह्या सलीम खान यांच्या परिवारातील एक अतूट हिस्सा आहेत. १९६० च्या ‘बारात’ या चित्रपटातून सलीम खान यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, पण नंतर मात्र सलीम यांनी त्यांचा मोर्चा लेखनाकडे वळवला. सलीम-जावेद या जोडीने ‘शोले’, ‘डॉन’, ‘दीवार’, ‘जंजीर’, ‘शान’सारख्या कित्येक अजरामर चित्रपट दिले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Screen writer salim khan married actress dancer helen even after family opposes avn
First published on: 24-11-2022 at 12:06 IST