Shah Rukh Khan Mumbai Airport Video : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. शाहरुख खानची एक झलक दिसावी, यासाठी चाहते त्याच्या बंगल्याबाहेर तासनतास उभे राहतात. विमानतळावर शाहरुख दिसला की चाहते त्याच्याबरोबर सेल्फी काढायला धावत असतात. चाहत्यांबरोबरच अनेकदा विमानतळ, विमानातील कर्मचारीही आपल्या लाडक्या स्टारला बघण्यास उत्सुक असतात.

गुरुवारी सकाळी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान मुंबई विमानतळावर दिसला. विमानतळावरील त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. यावेळी शाहरुख खानचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

शाहरुख खानचा व्हायरल व्हिडीओ नेमका काय?

या व्हिडीओमध्ये शाहरुख खान सिक्युरिटी चेकिंगच्या प्रक्रियेमध्ये दिसतोय. विमानतळावर, सुरक्षा रक्षक शाहरुख खानला त्याचा चश्मा काढण्यास सांगतो. मग शाहरुख खान शांतपणे चश्मा काढतो आणि प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहतो. तपासणी पूर्ण झाल्यावर, गार्ड हसतो. त्यानंतर शाहरुख खान त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि निघून जातो. शाहरुख खानची ही कृती चाहत्यांना फार आवडली असून ते त्याचं कौतुक करत आहेत.

व्हिडीओवर युजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी शाहरुख आणि सुरक्षा रक्षक दोघांचेही कौतुक केले. एका युजरने लिहिलं, “हे खूप छान आहे. सर्व नागरिकांना समान वागणूक दिली पाहिजे.” दुसऱ्याने लिहिलं, “शाहरुख खान खूप शांत आहे. तो स्टार असल्याचा दावा करणाऱ्या इतरांसारखा नाही. शाहरुख खान जगातील एक मोठा स्टार आहे.”

शाहरुख खान २ वर्षांपूर्वी दिसलेला मोठ्या पडद्यावर

शाहरुख खान शेवटचा २०२३ मध्ये मोठ्या पडद्यावर दिसला होता. २०२३ मध्ये त्याचे जवान, पठाण आणि डंकी हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. या तिन्ही चित्रपटांना चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ते बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले होते. याशिवाय शाहरुख खानने सलमान खानच्या टायगर ३ मध्ये कॅमियो केला होता.

शाहरुख खानचा आगामी चित्रपट

शाहरुख खानच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास येत्या कालात तो ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सुहाना खान, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चन यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शाहरुख खानच्या वाढदिवशी या चित्रपटाचा पहिला लूक शेअर करण्यात आला. किंग चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे.