Seema Sajdeh on ex husband Sohail Khan:सोहेल खान सध्या अलायन्स या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. हा शो अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. सोहेल खान या शोमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. इतर स्पर्धकांबरोबरील त्याचे बॉण्डिंग, इतर स्पर्धकांबरोबर तो ज्या पद्धतीने बोलतो, संवाद साधतो हे सगळेच लक्ष वेधून घेत आहे. चाहते त्याच्यावर, त्याच्या खेळावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेहही अलायन्स या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. नुकतीच ती शोमधून एलिमिनेट झाली आहे. जरी सोहेल व सीमाचा घटस्फोट झाला असला तरी त्यांच्यात मैत्रीचे नाते कायम आहे. आता सीमा सजदेहने याबद्दल एका मुलाखतीत वक्तव्य केले.
सीमा म्हणाली, “आम्ही दोन सुंदर मुलांचे आई-वडील आहोत. आमच्या घटस्फोटाला चार वर्षे झाली आहेत. त्या काळात भावनिक टप्प्यांतून आम्ही गेलो. पण, आज मुलांच्या बाबतीत आम्ही एक टीम आहोत. पती-पत्नी म्हणून जितके जवळ नव्हतो, त्यापेक्षा आज मित्र म्हणून अधिक जवळ आहोत, आमची मैत्री चांगली आहे.”
“आज आम्ही खूप चांगले…”
शोमध्ये सोहेलने त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या अडचणींसाठी स्वतःला जबाबदार धरले होते. तसेच या शोमुळे दोघांमधील नाते आणखी सुधारल्याचेही तो म्हणाला होता. यावर सीमा म्हणाली, “आम्ही द अलायन्स या शोमध्ये सहभागी होण्यापूर्वीही चांगले मित्र होतो आणि आमच्या मुलांचे को-पॅरेंटिंग करत होतो. सोहेल खूप भावनिक स्वभावाचा आहे. शोमधील बंदिस्त वातावरणामुळे तो आणखी भावूक झाला असावा, पण आम्ही आधीपासूनच मुलांसाठी एक युनिट आहोत आणि त्यांचे संगोपन एकत्रितपणे उत्तम प्रकारे करत आहोत. आज आम्ही खूप चांगले मित्र आहोत”, असे म्हणत सीमाने सोहेलबरोबर घटस्फोटानंतरही उत्तम मैत्री असल्याचे सांगितले.
सीमा पुढे असेही म्हणाली, “प्रत्येक घटस्फोटित जोडप्याप्रमाणे आम्हाला एकमेकांबद्दल राग होता, वाद होते, आमच्यात कटुताही होती, आम्ही या सगळ्या टप्प्यांमधून गेलो आहोत; पण आता ते सगळे मागे पडले आहे. कारण आमच्या दोन मुलांच्या भविष्यासाठी आम्ही एकत्र येऊन विचार करतो. मित्र म्हणून आम्ही एकमेकांचे चांगले सहकारी आहोत”, असे म्हणत तिने सोहेल व तिच्या नात्याबद्दल वक्तव्य केले.
दरम्यान, सोहेल व सीमा यांनी १९९८ ला लग्नगाठ बांधली होती. २०२२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. अलायन्स या शोमुळे हे जोडपे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
